घरबसल्या मिळणार विविध दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:34 PM2017-08-02T16:34:20+5:302017-08-02T16:48:36+5:30
नाशिक : जन्म-मृत्यूच्या दाखल्यांपासून ते विविध प्रकारच्या सेवा-सुविधा येत्या १५ आॅगस्टपासून नाशिककरांना घरबसल्या उपलब्ध होणार असून, त्यासाठी महापालिकेमार्फत आॅनलाइन सेवा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. नागरिकांना त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. मात्र, कायद्यानुसार विवाह नोंदणीसारख्या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थिती लावावी लागणार आहे.
महापालिकेमार्फत २२ नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ४५ प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. सद्यस्थितीत एस बॅँकेच्या सहकार्याने ही नागरी सुविधा केंद्रे चालविली जात आहेत. मात्र, येत्या १५ आॅगस्टपासून या सेवा आॅनलाइनच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. नागरिकांना आॅनलाइनद्वारे अर्ज करून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे. सध्या नागरिकांना जन्म-मृत्यूच्या दाखल्यापासून नगररचना, अग्निशमन विभागाशी संबंधित अनेक दाखल्यांसाठी मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये कार्यरत नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून अर्ज करावे लागतात. परंतु, आता सर्व ४५ प्रकारच्या सेवा आॅनलाइनच्या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत. नागरिकांनी आॅनलाइनद्वारेच अर्ज दाखल करायचा असून, प्राधिकृत अधिकाºयांच्या स्वाक्षरीने आॅनलाइनच दाखले उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अर्जाचे शुल्क अथवा दाखल्यांच्या प्रतींसाठी लागणारे शुल्कही नेट बॅँकिंगद्वारे आॅनलाइन भरणे शक्य होणार आहे. आॅनलाइन सेवांमुळे महापालिकेचा सद्यस्थितीत स्टेशनरीवर होणारा खर्चही वाचणार आहे. शिवाय, शासनाच्या लोक सेवा हक्क कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी होणे शक्य होणार आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि त्यांना कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागू नयेत, या उद्देशाने आॅनलाइन व्यवस्था अधिक प्रभावी व परिणामकारकपणे राबविण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. येत्या १५ आॅगस्टपासून या आॅनलाइन सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे.