आत्ता अव्वाच्या सव्वा दराने पाणी बिले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:22+5:302021-02-17T04:20:22+5:30
नाशिक- कोरोना काळात महावितरणने सरासरी पण भरमसाट विज बिले दिल्याचा वाद शमत नाही तोच आता नाशिक महापालिकेने देखील मोठा ...
नाशिक- कोरोना काळात महावितरणने सरासरी पण भरमसाट विज बिले दिल्याचा वाद शमत नाही तोच आता नाशिक महापालिकेने देखील मोठा धक्का दिला आहे. दर तीन महिन्यांनी देय असलेली बिले आता फेब्रुवारी महिन्यात पाठवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यंदा अव्वाच्या सव्वा बिले आली असून ती देखील आता मार्च महिन्याच्या आत भरायची असल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत.
महापालिकेने मीटर तपासले की सरासरी हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी नऊशे ते हजार रूपये बिल येत असलेल्या नागरीकांना तब्बल अडीच ते तीन हजार रूपयांपर्यंत बिले आल्याने या प्रकरणाची चाैकशी करावी अशी मागणी होत आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने एप्रिल महिन्यापासूनच घरपट्टी ऑनलाईन भरण्याची सुविधा आहे. परंतु त्यावर एक ते दहा टक्के सुट देखील असल्याने बहुतांश नागरीक घरपट्टी स्वत:हून भरतात. परंतु पाणी पट्टी मीटरचे वाचन करून येत असल्याने नागरीक प्रतिक्षा करतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आलेले कोरेानाचे संकट ऑक्टोबर - नोव्हेंबर पर्यंत तीव्र हेाते त्यानंतर आता केारोना नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. महापालिकेचे सर्व कामे कोरोनाकाळातच सुरळीत झाली आणि घरपट्टीच्या २३२ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी अभय येाजना देखील राबविण्यात येत असली तरी पाणीपट्टीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. आणि आता फेब्रुवारी महिन्यात पाणीपट्टीची देयके दिली जात आहेत.
तीन तीन महिन्यांच्या रोटेशनने नाही तर एकाच वेळी वार्षिक पाणीपट्टीची देयके नागरिकांना वाटण्यात आली आहेत. सर्वसामान्यत: नागरिकांना दरवर्षीची पाणीपट्टी माहिती असते मात्र यंदा दुप्पट- तिप्पट बिले देण्यात आल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत त्यातच मार्च महिन्याच्या आत बील भरणे क्रमप्राप्त आहे, अन्यथा पाणी पुरवठा तोडण्यात येणार असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
इन्फो...
मीटर रिडींग कधी केले?
अनेक नागरिकांकडे तर मीटर तपासण्यासाठी मनपा कर्मचारी देखील कधी गेले हेच माहिती नाही त्यामुळे ही बिले कशी काय दिली असा नागरिकांचा प्रश्न आहे.
कोट...
महापालिकेकडून पाणीपट्टीची बिले वाटण्यात आली आहेत. त्यात वाढीव बिलाविषयी तक्रार असल्याचे समेार आले तर त्याची पडताळणी करता येईल.
- संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता, मनपा