आता रेशनवर मिळणार मका, बाजरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:33+5:302021-02-17T04:19:33+5:30
नाशिक: आधारभूत किमतीत खरेदी केलेले भरड धान्य रेशनवर देण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना आता रेशनवर मका वितरीत केला जाणार ...
नाशिक: आधारभूत किमतीत खरेदी केलेले भरड धान्य रेशनवर देण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना आता रेशनवर मका वितरीत केला जाणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम रेशनकार्ड धारकांना फेब्रुवारीत रेशनवर मका दिला जाणार असल्याने यापूर्वी मिळणारा गहू मात्र कमी करण्यात आला आहे. मक्याची मागणी नसतांना गहू कमी करण्यात आल्याने मात्र कार्डधारक नाराज आहेत.
जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रांवर १ लाख ५७ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आलेला आहे. शासनाच्या योजनेनुसार जिल्ह्यात खरेदी केलेले भरड धान्य रेशनवर वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रावरून खरेदी करण्यात आलेला मका रेशन दुकानांतून द्यावा लागणार आहे. अंत्याेदय तसेच प्राधान्यक्रम कुटुंबातील कार्डधारकांना मका घ्यावा लागणार आहे.
अंत्योदय कार्डधारकांना ६ किलो गहू, ११ किलो मका, ९ किलो तांदूळ या प्रमाणे धान्य दिले जाणार आहे. तर प्राधान्यक्रम कुटुंब कार्डधारकांना १ किलो गहू, २ किलो मका आणि २ किलो तांदूळ दिला जाणार आहे. इगतपुरी, नाशिक ग्रामीण, पेठ आणि नाशिक शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये याप्रमाणे धान्याचे वाटप केले जाणार आहे. ज्या तालुक्यांमधील मका खरेदी केद्रांवरून खरेदी करण्यात आली त्याच तालुक्यात रेशनवर भरड धान्य देण्याची योजना असल्याने तेथील रेशन दुकानांमधून मका वितरित केला जाणार आहे.
--इन्फो--
पुढील महिन्यात बाजरी,ज्वारी
नाशिकमध्ये खरेदी केंद्रांवर मका खरेदी करण्यात आल्यानंतर पुढील महिन्यात बाजरी खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना बाजरी देखील उपलब्ध होणार आहे. काही केंद्रांवरून ज्वारी खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात २९०० क्विंटल बाजरी तर ४ हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात ज्वारी, बाजरी कार्डधारकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात तसेच त्यानंतरही रेशनवर गहू आणि तांदूळ देण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. आता ज्वारी, बाजरी देखील मिळणार असल्याने ग्राहकांना अधिक लाभ होणार आहे. मक्याऐवजी गहूच मिळावा अशी मागणी ग्राहकांकडून होतांना दिसत आहे.
--कोट--
शासनाच्या योजनेप्रमाणे आधारभूत किमतीत खरेदी करण्यात आलेले धान्य रेशनवर वितरित केले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातून खरेदी करण्यात आलेला मका कार्डधारकांना पुढील दोन महिने पुरवठा केला जाणार आहे. मका आल्यामुळे गव्हाचे प्रमाण कमी केले जाणार आहे. एकूण धान्यात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. मार्चनंतर रेशनवर बाजरी देखील मिळणार आहे.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी.
--कोट--
रेशनवर मिळणाऱ्या डाळीबाबतची अनिश्चितता असतांना डाळ पुरवठा करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे अपेक्षित असतांना मका माथी मारला जाणार आहे. डाळीची घोषणा करून डाळ मात्र दुकानांतून ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. याबाबतची यंत्रणा तपासण्याची गरज आहे. या मक्याचा सर्वसामान्यांना कितपत उपयोग होणार आहे याचा विचार करण्यात आलेला दिसत नाही. गहू कमी करून मका दिला जाणार असल्याचे दुकानदार सांगत आहेत. मक्याची भाकर किती लोक करणार याचाही विचार करणे गरजेचे आहे.
- गोरक्षनाथ राऊत, लाभार्थी
---कोट--
रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्याचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. रेशनवर मिळणाऱ्या धान्याचा अनेकांना आधार आहे. गहू, तांदूळ नियमित मिळत असल्याने उदरनिर्वाह होत होता. परंतु तेल, साखर देखील पूर्वीप्रमाणेच दिले तर दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब कुटुंबीयांना त्याचा लाभ होणार आहे. आता देण्यात येणाऱ्या गहू, तांदळात कपात केली जाणार असेल आणि मका मिळणार असेल तर मक्याचे करायचे काय? मका ऐवजी,ज्वारी, बाजरी तरी देण्यात यावी.
- विजय अहिरे, लाभार्थी