आता शासनाच्या नव्हे, तर वारकऱ्यांच्या श्रमातून जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:02 PM2018-08-05T16:02:45+5:302018-08-05T16:06:10+5:30
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास शासनाकडून कोणताही निधी न मिळाल्याने आता शासनाकडे विनंती न करता वारकऱ्यांच्या श्रमातूनच संजीवन समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाईल, असा विश्वास जीर्णोद्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या कामासाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास शासनाकडून कोणताही निधी न मिळाल्याने आता शासनाकडे विनंती न करता वारकऱ्यांच्या श्रमातूनच संजीवन समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाईल, असा विश्वास जीर्णोद्धार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या कामासाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथे आयोजित बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामास विलंब होत असल्याने या कामास गती मिळावी, यासाठी हभप महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिराची जिल्हास्तरीय जीर्णोद्धार समिती स्थापन करण्यात आली. या समितीने शासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला होता. अनेक महिने उलटूनही तीर्थ विकासासाठी असणारा निधी मिळाला नसल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.
सकल महाराष्टÑाचे दैवत असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत आता शासन दरबारी कोणत्याही प्रकारच्या अर्ज विनंत्या न करता वारकºयांच्या श्रमातून आणि दानातून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. निधी संकलनासाठी नाथांचा एक रथही तयार करण्यात येणार आहे. निधी संकलनासाठी सदर रथ हा जिल्ह्यात फिरविण्यात येणार आहे. कीर्तकारांनी आपल्या कीर्तनातून जीर्णोद्धाराविषयी माहिती देण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. मंदिराचे सर्व कामकाज हे काळ्या पाषाणात होणार असून सभागृह, प्रवेशद्वार व इतर परिसर सुशोभिकरण करण्यात येणार आहे. बैठकीस पुंडलिक थेटे, निवृत्तिनाथ संस्थानचे अध्यक्ष संजय नाना धोंडगे, पंडित कोल्हे आदी उपस्थित होते.