मुंबईतील पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 08:13 PM2021-07-18T20:13:19+5:302021-07-18T20:18:05+5:30
मुंबईतील पावसामुळे मनमाड रेल्वेस्थानकात दोन, लासलगाव येथे १, तर नाशिकरोड रेल्वेस्थानकात १, देवळीत एक अशा गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. पुढील सूचना मिळेपर्यंत या गाड्या स्थानकातच थांबविण्यात आल्या होत्या. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झाली
नाशिक : मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, रेल्वेगाड्या आहेत त्या ठिकाणीच थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण रेल्वेयंत्रणा कोलमडून पडली आहे. रविवारी नाशिकरोड स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्या रद्द करण्याची वेळ आली आहे. पंचवटी, राज्यराणी एक्सप्रेस रद्द झालीयामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने थैमान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषत: मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलसह रेल्वेगाड्यांवरही त्याचा परिणाम झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या जवळपास आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई - जबलपूर गरीबरथ विशेष यात्रा गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा गाडी, मुंबई - नागपूर विशेष यात्रा गाडी, मुंबई - आदिलाबाद, मुंबई - गोंदिया, मुंबई - मनमाड, मुंबई - सिकंदराबाद, मुंबई - अमरावती, मुंबई - नांदेड राज्यराणी या गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.