प्रवेश नाकाल्याने विद्यार्थी कनिष्ठ लिपिक परीक्षेस मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 06:17 PM2019-03-03T18:17:44+5:302019-03-03T18:19:41+5:30
इंदिरानगर : कोषागार विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी रविवारी (दि. ३) गुरू गोविंदसिंह केंद्रावरील आॅनलाइन परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना परीक्षा ...
इंदिरानगर : कोषागार विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी रविवारी (दि. ३) गुरू गोविंदसिंह केंद्रावरील आॅनलाइन परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात न सोडण्यात आल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे निवेदन पोलिसांकडे सादर केले.
इंदिरानगर येथील गुरू गोविंदसिंह महाविद्यालयात वित्त विभागाच्या कोषागार विभागाची कनिष्ठ लिपिक पदासाठी आॅनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी विभागातील विद्यार्थी हजर झाले होते. सकाळी जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात सोडण्याची विनंती गेटवरील कर्मचाऱ्यांना केली, मात्र सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळेचे कारण देत केंद्रात सोडण्यास नकार दिला. यावेळी परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी समोर न आल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यातील काहींनी परीक्षा केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना परीक्षेसाठी संगणकदेखील मिळाला नाही. या गोंधळामुळे संबंधितांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीसे वातावरण निवळले, मात्र या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. त्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जाऊन आपण सकाळी ९.१५ वाजता परीक्षा केंद्रावर हजर असतानाही सुरक्षारक्षकांनी केंद्रात सोडले नसल्याचा दावा निवेदनात केला आहे. निवेदनावर विवेक माळी, राजेंद्र कातकडे, मंजुषा शिरसाठ, मनोज पगार, विशाल मोगल, माधुरी गायकवाड, शीतल घुगे, अर्जुन श्रीवास्तव यांसह अनेक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.