जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 07:25 PM2020-12-11T19:25:18+5:302020-12-11T19:26:35+5:30
नाशिक : डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ...
नाशिक: डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार येत्या २३ तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल तर १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. यापूर्वी स्थगित झालेल्या जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींना नव्या वर्षात नवे कारभारी लाभणार आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींबरोबरच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. आयोगाच्या कार्यक्रमानुसार येत्या १५ डिसेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील,
दि. २३ ते ३० या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी, ४ जानेवारीला अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हे वाटप केली जाणार आहेत. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. १८ रोजी मतमोजणी केली जाईल असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.