राजकीय पक्षांनीही केली ईव्हीएमची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 07:28 PM2019-09-05T19:28:28+5:302019-09-05T19:35:50+5:30
नाशिक : मतदान यंत्रांविषयी असलेली शंका दूर करण्याबरोबरच या यंत्रांचे कामकाज कसे चालते हे जवळून बघण्याची संधी मिळाल्याने अनेक ...
नाशिक: मतदान यंत्रांविषयी असलेली शंका दूर करण्याबरोबरच या यंत्रांचे कामकाज कसे चालते हे जवळून बघण्याची संधी मिळाल्याने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यंत्रणांची पाहाणी केली आहे. राष्टÑीय आणि राज्य पक्षांच्या स्थानिक नेत्वृत्वाचा यामध्ये समावेश असून अनेक राजकीय व्यक्तींकडून याबाबतची विचारणा देखील केली जात आहे.
मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून् ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवार पासून पाच दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेत अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अंबडच्या वेअर हाऊस गोडावूनमध्ये येऊन यंत्रणेबाबतची खात्री करवून घेतली आहे. सदर यंत्रांची कार्यपद्धती, अचूक क्रिया आणि योग्य मतदान पडते किंवा नाही याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची संधी राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना या रंगीत तालीमप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने संपूर्ण तयारी केली असून, निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या सुमारे २१ हजार यंत्रांची पडताळणीदेखील पूर्ण करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी प्राप्त झालेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन या अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस गुदामात ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेत या यंत्रांचे कामका आणि यंत्राच्या सुरक्षिततेविषयीची माहिती राजकीय पक्षांना असावी यासाठी त्यांना विशेष ‘मॉकपोल’ दाखविण्यात आला.
यावेळी राजकीय पक्षांना मतदान प्रक्रियेत राबविण्यात येणारे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट यांची माहिती येथील तंत्रज्ञांनी दिली. प्रत्यक्ष कामकाज, यंत्राची अंतर्गत आणि बर्हिगत रचना आणि यंत्रांच्या सुरक्षिततेची माहिती राजकीय पक्षांना दिली जात आहे.