आता गावागावात होणार प्लॅस्टिकबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:37 PM2018-07-30T22:37:19+5:302018-07-30T22:38:39+5:30
नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेत गावागावांची तापसणी होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सर्व गावे प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी गावांच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यांमध्ये कार्यशाळा घेतली जाणार आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) व प्लॅस्टिकबंदी या विषयावर सर्व १५ तालुक्यांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी नाशिक तालुक्याची एक दिवसीय कार्यशाळा पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे व जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण हा स्वच्छता कार्यक्र माचा मापदंड असून, नाशिक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या निकषानुसार या सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याचे तसेच नाशिक तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेऊन स्वच्छ सर्वेक्षणात तालुक्याचे नाव अग्रस्थानी नेण्याचे आवाहन केले.
पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी स्वच्छ सर्वेक्षण व प्लॅस्टिकबंदी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. १ आॅगस्टपासून देशात ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू होत असून, यामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी गावात याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. ग्रामीण भागात प्लॅस्टिकबंदीची तत्काळ अंमलबजावणी करून दंडवसूल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. स्वच्छ सर्वेक्षण व प्लॅस्टिकबंदीच्या कामात हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.