कुशल चोपडा दुहेरी मुकुटाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 06:26 PM2018-12-10T18:26:33+5:302018-12-10T18:27:39+5:30
बाबा बोकील टेबल टेनिस : मुलींमध्ये सायली बक्षी विजेती नाशिक : गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या वतीने आणि नाशिक ...
बाबा बोकील टेबल टेनिस : मुलींमध्ये सायली बक्षी विजेती
नाशिक : गंगापूररोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळाच्या वतीने आणि नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या सहकार्याने ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक तथा संघटक कै. बाबा बोकील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अकराव्या टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा हा दुहेरी मुकुटाचा मानकरी ठरला.
चोपडाने कॅडेट आणि सब ज्युनियर गटाचे विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट पटकावला, तर कॅडेट मुलीमध्ये सायली बक्षी, सबज्युनियर मुलीमध्ये सायली वाणी, तर पुरुष गटात सौमित देशपांडेने यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.
कॅडेट मुलामध्ये चोपडाने अंतिम लढतीत पीयूष जाधवला ०८-११, ११-०७, ११-०४ आणि ११-०३ अशा ३-१ फरकाने असे पराभूत करून विजेतेपद मिळविले, तर सबज्युनियर गटातही या दोघांमध्येच अंतिम लढत झाली. यामध्येही कुशल चोपडाने पीयूष जाधवला ०८-११, ११-०७, ११-०४ आणि ११-०३ असा सरळ ३-१ पराभूत करून दुहेरी यश संपादन केले.
कॅडेट मुलीच्या अंतिम सामन्यात सायली बक्षी हिने फोर हॅण्ड टॉप स्पीनचा सुंदर वापर करत निताली पूरकर हिचा ११-०३, ११-०४ आणि ११-०९ असा सरळ पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळविले. मुलीच्या सबज्युनियर गटाचा सामना फारच रंगतदार झाला. या गटाची अंतिम लढत तनिषा कोटेचा आणि सायली वाणी या दोन राष्ट्रीय खेळाडूमध्ये झाली. या सामन्यात सायली वाणी हिने बॅक हॅण्ड ब्लॉकिंगचा सुंदर वापर करीत पहिला सेट ११ विरु द्ध ०७, तर दुसरा सेट ११-०९ असा असा जिंकून आघाडी मिळविली. मात्र तिसऱ्या सेटमध्ये तनिषाने संयमाने खेळ करून चांगली लढत दिली. या सेटमध्ये ११-११ अशा बरोबरीनंतर तनिषाने हा सेट १५-१३ असा जिंकून आपले आव्हान कायम राखले.
चौथ्या सेटमध्ये सायली वाणीने आपल्या फोर हॅण्डच्या जोरावर हा सेट ११-०८ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. पुरुषांच्या गटातील सौमित देशपांडे आणि ओंकार जोग यांच्यातील अंतिम सामनाही चांगलाच अटीतटीचा झाला. हा सामना पाच सेटपर्यंत लांबला. राष्ट्रीय खेळाडू सौमित देशपांडेने पाहिले दोन सेट ११-०८ आणि ११-०८ असे जिंकून आघाडी मिळविली. परंतु त्यानंतर ओंकार जोगने मुसंडी मारून तिसरा आणि चौथा सेट ११-०५ आणि ११-०२ असा जिंकून २-२ अशी बरोबरी साधली. या बरोबरीनंतर झालेल्या निर्णायक पाचव्या सेटमध्ये सौमित देशपांडेने ११-०७ असा जिंकून या गटाचे विजेतेपद पटकावले.