समाज उभारणीत शिक्षक महत्वाचा घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:39 PM2018-09-05T17:39:08+5:302018-09-05T17:44:29+5:30
नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठी देखील शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही.समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
प.सा. नाट्यगृह येथे आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतिंद्र पगार, बांधकाम सभापती मनिषा पवार, महिला बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, समाजकल्याण सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.
ग्रामीण भागात सेवा करणारे शिक्षक नक्कीच आदर्शवत काम करीत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवितांना शिक्षकांनी आपली मुले म्हणून ज्ञानदान केले पाहिजे असेही सांगळे यांनी यावेळी म्हटले. जिल्हा परिषदेचे अनेक उपक्रम राबविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची राहिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या पदापर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षकांचे देखील योगदान असते हे विसरता कामा नये असे सांगून शिक्षकांनी अधिक सक्षमतेने कार्य केले पाहिजे असेही सांगळे यांनी यावेळी सांगितले. शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. शिक्षक पुरस्कारांची निवड अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली असल्याचे सांगत अध्यापनाबरोबरच शिक्षकांचे इतर कामामध्येही महत्वाचे योगदान असल्याचे नमूद केले. गुणवंत शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी शिक्षकांनी नवीन ज्ञान, कौशल्य आत्मसात करून आपल्यातील क्षमता ओळखून स्वता:ला प्रगल्भ केले पाहिजे असे सांगितले.
धावपटू वर्षा चौधरी व ताई बामणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, डॉ. भारती पवार, महेंद्रसिंग काले, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत शिरसाठ, सुरेश कमानकर, दिपक शिरसाठ, रोहिणी गावित, कान्हू गायकवाड, राजेश पाटील, पंडीत अहेर, जगन्नाथ हिरे, निफाड पंचायत समतिी सभापती राजेश पाटील, सदस्य पंडित आहेर, धर्मा देवरे आदि मान्यवर उपस्थित होते.