नामको बिनविरोध करण्यामागे संख्येचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:40 AM2018-11-15T00:40:44+5:302018-11-15T00:41:03+5:30
नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नागरी बॅँक फेडरेशनने मध्यस्थी केली खरी, परंतु जागा वाटपावरून घोडे अडले आहे. सहकार पॅनलने (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या समर्थकांच्या ‘प्रगती’कडे १० जागांची मागणी केली असून, त्यामुळे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही.
नाशिक : नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नागरी बॅँक फेडरेशनने मध्यस्थी केली खरी, परंतु जागा वाटपावरून घोडे अडले आहे. सहकार पॅनलने (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या समर्थकांच्या ‘प्रगती’कडे १० जागांची मागणी केली असून, त्यामुळे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. बागमार समर्थकांचे वीस संचालक गेल्यावेळी निवडून आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात माजी संचालकांना उमेदवारी नाकारता येणे शक्य नसल्याचे प्रगती पॅनलचे म्हणणे आहे. डिसेंबर महिन्यात होत असलेल्या नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीसाठी बागमार समर्थक माजी संचालकांनी प्रगती पॅनल तयार केले असून, ललित मोदी, गजानन शेलार यांच्यासह अन्य मान्यवर माजी संचालकांचे सहकार पॅनल परंपरेने विरोधात उभे ठाकले आहे. २०१४ पासून बॅँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्यानंतर बॅँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा एनपीए वाढत गेला आहे. त्यामुळे निवडणूक टळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरी बॅॅँक फेडरेशने पुढाकार घेऊन संस्थेच्या गोविंदनगर येथील कार्यालयात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत प्रगती पॅनलच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना सोहनलाल भंडारी यांनी बॅँकेची आर्थिक अवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे मात्र केवळ प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविण्याऐवजी सहकार क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे किंवा नामकोतच अनेक वर्षे संचालक म्हणून काम करणाऱ्यांना संधी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, सहकार पॅनलकडून तब्बल २१ पैकी दहा जागांची मागणी करण्यात आल्याने त्यावर तोडगा निघाला नाही. सहकार पॅनलने वास्तव तोडगा काढावा आणि अगोदरच्या संख्याबळाच्या तुलनेत जागांची मागणी करावी, अशी सूचना भंडारी यांनी केली आहे.
काय होते यापूर्वीचे संख्याबळ
नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेवर २०१४ प्रशासक नियुक्त करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या निवडणूक हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली २० उमेदवार निवडून आले होते. तर सहकार पॅनलचा उमेदवार निवडूून आला होता. त्यामुळे आता निवडणूक लढविण्यासाठी त्याचाच विचार करावा, अशी प्रगती पॅनलची भूमिका असल्याचे प्रगती पॅनलचे हेमंत धात्रक यांनी सांगितले. राजकीय नेत्यांना उमेदवारी देण्यापेक्षा ज्यांनी नामकोत यापूर्वी संचालक म्हणून काम केले आहे किंवा सहकार क्षेत्रातील ज्ञान आहे अशांनाच उमेदवारी द्यावी त्यासाठी प्रगती दोन पाऊले मागे येण्यास तयार असल्याचे धात्रक यांनी सांगितले.