अपघातातील मृतांची संख्या २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:39 PM2020-01-29T23:39:47+5:302020-01-30T00:21:55+5:30

देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Number of casualties in accident | अपघातातील मृतांची संख्या २६

अ‍ॅपेरिक्षा व बस अपघात ज्या ठिकाणी झाला त्या विहिरी भोवती लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या.

Next
ठळक मुद्देमृतांवर अंत्यसंस्कार : रिक्षातील मयतांच्या वारसांनाही मदत जाहीर

नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी देवळा-मालेगाव येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता धुळे-कळवण बस रिक्षेवर धडकल्यानंतर बससह रिक्षा विहिरीत पडली. या भीषण अपघातात २६ जणांचा बळी गेला. मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत विहिरीत अडकलेल्या २५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. परंतु, मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रात्री उशिरा थांबविण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (दि.२९) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास निंबायती येथील दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, एनडीआरएफचे पथकही मदतकार्यात सहभागी झाले होते. घटनास्थळी विहिरीतून बाहेर काढलेल्या प्रवाशांचे सामान, चपला-बूट यांचा खच पडलेला होता, तर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला होता. रिक्षात असलेल्या मन्सुरी कुटुंबीयांतील आठ जणांचा बळी गेल्याने त्यांचे मूळ गाव येसगाव तर शोकसागरात बुडाले होते.

रिक्षातील मयतांच्या वारसांना मदत जाहीर
पालकमंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव-देवळा येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रिक्षातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळी पाहणी करतानाच जखमींची विचारपूस केली.

अपघाताच्या कारणांचा शोध सुरू
अपघाताच्या कारणांचा शोध परिवहन महामंडळाने सुरू केला आहे. जखमी प्रवाशांनीही चालकास जबाबदार धरले आहे. बसचे पुढील टायर फुटून सदर अपघात घडल्याचे प्रारंभी सांगितले जात होते; परंतु, विहिरीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर बसचे सर्व टायर्स सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला, याची चौकशी परिवहन महामंडळाने आरंभली आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक संदेश
अपघाताबद्दल राष्टÑपती आणि पंतप्रधान यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, महाराष्टÑातील नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची घटना ऐकून दु:ख झाले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्याप्रति संवेदना प्रकट करतो. जखमी व्यक्ती लवकरच बरे होवोत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्टÑाच्या नाशिकमध्ये घडलेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दु:खदप्रसंगी मी मृतांच्या नातेवाइकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा, असे ट्विट केले आहे.

Web Title: Number of casualties in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात