बस अपघातातील मृतांची संख्या २६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 02:22 PM2020-01-29T14:22:08+5:302020-01-29T14:22:29+5:30
मालेगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - कळवण बसचे टायर फुटून समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षासह बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे.
मालेगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - कळवण बसचे टायर फुटून समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षासह बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. बुधवारी सकाळी सिदधी वनसे या दोन वर्षीय बालिकेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. येसगाव येथे व मालेगाव सामान्य रूग्णालयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट देत जखमींची विचारपूस केली.
मंगळवारी (दि. २८) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास देवळा - मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळ धोबी घाट परिसरात हा अपघात झाला होता. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना वाचविण्याचा प्रयत्न केला. कळवण आगाराची बस (क्र.एमएच ०६ एस ८४२८) धुळ्याहून कळवणकडे जात होती. देवळा - मालेगाव रस्त्यावर बस मेशी फाट्यानजीक धोबी घाट परिसरात आली असता बसचे पुढचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस शेजारच्या रिक्षाला धडकली आणि रिक्षाला फरफटत नेत विहिरीत जाऊन पडली होती. सदर अपघात घडल्यानंतर आसपासचे शेतकरी मदतीसाठी धावले. परंतु, विहिरीत उतरण्यासाठी जागाच नसल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते.