कोरोना चाचण्यांची संख्या पुन्हा तिपटीने वाढविणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:04 AM2021-10-01T01:04:48+5:302021-10-01T01:05:46+5:30
पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या सण, उत्सवांच्या कालावधीत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, याबाबत खबरदारी म्हणून लसीकरणापूर्वी प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांसह लक्षणे दिसणाऱ्या सर्वांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरासह जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक भर पडणार आहे.
नाशिक : पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या सण, उत्सवांच्या कालावधीत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, याबाबत खबरदारी म्हणून लसीकरणापूर्वी प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांसह लक्षणे दिसणाऱ्या सर्वांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरासह जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक भर पडणार आहे.
गत काही दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने शंभरच्या आसपास राहत असून त्यात घट आलेली नाही. त्यामुळे किमान सणासुदीच्या दिवसांमध्ये कोरोना वाढू नये, यासाठी शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट तसेच लक्षणे आढळल्यास आरटीपीसीआर टेस्ट करण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांच्या किट्सची उपलब्धता असूनही चाचण्या कमी झाल्या होत्या. मात्र, आता नवरात्रोत्सव तसेच दसऱ्यासारखे बाजारात आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारे सण ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धातच असल्याने चाचणी घेण्याचा वेग वाढविण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेली आरोग्य तपासणी मोहीम काहीशी थंडावली होती. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाणदेखील बरेचसे कमीच होते. मात्र, आता ॲन्टिजेन चाचण्या वाढवण्यात आल्यास बाधितांच्या संख्येत थोडीफार वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इन्फो
गतवर्षी शहरात ८ हजार, यंदा २ हजार
या चाचण्यांमुळेच रुग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी त्यांना वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात येतोय म्हणून पुढील संसर्ग होण्यास आळा बसतो. कोरोना कमी झाल्याच्या किंवा संपुष्टात आल्याच्या भ्रमात गर्दीच्या ठिकाणीदेखील फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळेदेखील बाधित रुग्णांची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये दिवसाला ७ ते ८ हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत होत्या. ही संख्या मधल्या काळात कमी झालेली दिसून आली. परंतु, लक्षणे नसल्याने चाचण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील कमी झाल्याने चाचण्या कमी दिसत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते. सध्या शहरात २ हजारांच्या आसपास चाचण्या सुरू आहेत. त्यातील सुमारे दीड हजार चाचण्या रॅपिड ॲन्टिजेन तर पाचशेच्या आसपास आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.
इन्फो
शहरात लसीकरणापूर्वी रॅपिड ॲन्टिजेन
शहरातील केंद्रांवर लसीकरणापूर्वी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व नागरिकांची ॲन्टिजेन तसेच लक्षणे दिसणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या चाचण्या नागरिकांच्या दृष्टीने सुरक्षिततेसाठीच असून नागरिकांनी ॲन्टिजेनसह लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.
डॉ. अजिता साळुंखे, लसीकरण अधिकारी