शहरात कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:28 AM2021-02-21T04:28:55+5:302021-02-21T04:28:55+5:30
नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाढती चिंताजनक स्थिती बघता महापालिकेसह सर्व शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या ...
नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाढती चिंताजनक स्थिती बघता महापालिकेसह सर्व शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व शासकीय खाते प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेची यंत्रणाही सज्ज झाली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने सध्या नाशिकरोड येथील बिटकेा रुग्णालय आणि जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे. मात्र त्या ठिकाणी सद्या उपचार घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. बिटको रुग्णालयात सातशे बेडची व्यवस्था आहे. तेथे सध्या ३५ रुग्ण उपचार आहे. तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दीडशे रुग्णांवर उपचारांची सोय आहे. तेथेही सद्या ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे संख्या एकदम रुग्ण संख्या वाढेल, अशी अवस्था नाही. गरज भासल्यास आधी या दोन रुग्णालयांची क्षमता बघून मगच पुढील निर्णय घेण्यात येईल. नाशिकराेडच्या बिटको रुग्णालयात सध्या सातशे रुग्णांची व्यवस्था असली तरी आणखी तीनशे रुग्ण तेथे दाखल होऊ शकतील. त्यामुळे तूर्तास कोविड सेंटर बंद करण्याची गरज नसल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
नाशिक शहरात सध्या बिटको रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय तसेच सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालय व पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालयात आरटीपीसीआर चाचण्यांची सोय आहे. आता शहरातील मध्यवर्ती असलेल्या शालिमार येथील आयएमए तसेच सातपूर येथील मनपाच्या मायको रुग्णालयात देखील आरटीपीसीआरची सुविधा येत्या सोमवारी किंवा जास्तीत जास्त मंगळवारपासून (दि.२३) उपलब्ध होईल. अर्थात कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्यांचीच या ठिकाणी चाचणी घेतली जाणार आहे.
इन्फो..
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील कोविड केअर सेंटर तत्काळ सुरू करण्याची गरज नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले. मात्र ५० प्राथमिक आरोग्य केंद्रातदेखील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
इन्फो...
रुग्णांचा गृहविलगीकरणावर भर
कोरोना बाधितांचा सुरुवातीला रुग्णालयात दाखल होण्यावर भर होता. मात्र आता घरीच राहून उपचार घेण्यावर भर आहे. शुक्रवारी (दि.१९) एकूण १५४ रुग्ण आढळले. त्यातील १२० रुग्णांनी घरी राहूनच उपचार घेणे पसंत केले तर ३४ बाधितच रुग्णालयात दाखल झाले.