डेंग्यूची संख्या पाचशेच्या घरात ; स्वाइन फ्लूचे सात बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:00 AM2018-09-26T01:00:35+5:302018-09-26T01:01:37+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे.
नाशिक : पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे. डेंग्यूमुळे आत्तापर्यंत एकाचा बळी गेला आहे. दुसरीकडे स्वाइन फ्लूची रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढत असून, महापालिकेने सुमारे साडेआठ हजार आजारी नागरिकांची प्राथमिक तपासणी (स्क्रिनिंग) केले त्यात ८७ अधिकृत रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूचे आत्तापर्यंत सात बळी गेले आहेत. तथापि, त्यातील दोन बळी हे हृदयविकाराने दगावल्याचा महापालिकेचा दावा आहे.
पावसाळ्यात रोगराई डोकेवर काढते हे खरे असले तरी यंदादेखील उच्चांक होत असून, महापालिकेच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याची तक्रार होत आहे. याचे कारण म्हणजे शहरात दिवसेंदिवस रोगराई वाढत असून, दिवसागणिक त्यात भर पडत आहे. महापालिकेच्या दफ्तरी नोंदीपेक्षा अधिक रुग्ण शहरात असून व्हायरल, इन्फेक्शनमुळे त्यात भर पडत आहे.
महापालिका राजकारणातच दंग
शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना प्रशासन मात्र थंड असून, अन्य विषयात ज्याप्रमाणे प्रशासन द्रुतगतीने कारवाई करते, त्या वेगाने कारवाई होत नाही. राजकारण, लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त यांच्यात संघर्षही होतात, मात्र संपूर्ण शहरात रोगराई थैमान घालत असताना संबंधित सारेच बससेवा आणि अन्य विषयांत मग्न आहेत.
सप्टेंबरमध्ये १२६ डेंग्यू रूग्ण
१ जानेवारी ते २१ सप्टेंंबर दरम्यान, महापालिकेच्या एक हजार ७५५ संशयित रुग्ण आढळले असून, त्यांची तपासणी केली असता ४९४ जणांना डेंग्यू झाल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेतील तपासणीअंति काढण्यात आला आहे. १ ते २१ सप्टेंबर म्हणजेच चालू महिन्यात ४५२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यांची तपासणी केली असता १२६ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. एकवीस दिवसांत सव्वाशे रुग्ण संख्येची मजल गाठल्याने यापुढे आणखी रुग्ण आढळल्यास विक्रम होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या एकवीस दिवसांत २७५ संशयित रुग्ण आढळले होते. त्यात १०५ रुग्ण आढळले होते. त्या पुढे जाऊन आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, जानेवारीपासून आत्तापर्यंत ८ हजार ७६० रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आले आहेत. त्यात ८७ रुग्ण आढळले आहेत.