बाधित रुग्णसंख्या २ हजारांखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:00+5:302021-05-15T04:15:00+5:30
नाशिक : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी घट आली असून शुक्रवारी (दि. १४) एकूण १८८७ नवीन बाधित आढळले ...
नाशिक : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी घट आली असून शुक्रवारी (दि. १४) एकूण १८८७ नवीन बाधित आढळले असून २०५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान गुरुवारी एकूण ३६ बळींची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ४०४० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र गत चार दिवसांपासून दिसून येत आहे. शुक्रवारी तर बाधित संख्या दोन हजारांखाली गेल्याने आरोग्य विभागाला देखील काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कठोर लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्याचा परिणाम बाधित संख्येच्या घटमधून दिसून येत आहे. मात्र, बळींच्या संख्येत अद्याप तरी फारशी घट झालेली नाही. त्यामुळे कोरोनाबाधित संख्या घटली असली तरी आता बळींच्या प्रमाणात घट आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी २० तर नाशिक मनपा क्षेत्रात १३ तर मालेगाव मनपा क्षेत्रात ३ जणांचा बळी असे ३६ बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ४०४० वर पोहाेचली आहे. जिल्ह्यातील १८८७ बाधितांपैकी ९६५ नाशिक मनपा, ९१५ नाशिक ग्रामीण तर मालेगाव मनपा क्षेत्रातील ७ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या ४५४२ वर गेली आहे.
इन्फो
कोरोनामुक्त ९३ टक्क्यांवर
जिल्ह्यात मार्चच्या मध्यावर ८३ टक्क्यांपर्यंत घसरलेल्या कोरोनामुक्त नागरिकांच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.१४) कोरोनामुक्त नागरिकांचा दर ९३.३१ वर पोहोचला आहे. त्यात ९४.३२ टक्के नाशिक मनपा, ९२.१८ नाशिक ग्रामीण, ८६.६७ मालेगाव मनपा, तर जिल्हाबाह्य ९६.०८ असा कोरोनामुक्त रुग्णसंख्येचा दर आहे.