मनपा अंगणवाडीतील मुलांच्या पटसंख्येत घट; अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या नोकरीवर गदा
By Suyog.joshi | Updated: February 8, 2025 18:02 IST2025-02-08T18:01:07+5:302025-02-08T18:02:19+5:30
लवकरच अंगणवाड्यांतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार

मनपा अंगणवाडीतील मुलांच्या पटसंख्येत घट; अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या नोकरीवर गदा
सुयोग जोशी, नाशिक : गेल्या काही वर्षांपासून मुलांची संख्या घटत असल्याने महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांना कमी केले जाणार आहे. लवकरच अंगणवाड्यांतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिकेच्या शहरात सुमारे तीनशेच्या आसपास अंगणवाड्या असून मुख्यसेविका, अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यावर या अंगणवाड्यांची जबाबदारी आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात. दरम्यान, मागील काही वर्षांत शहरात खासगी अंगणवाड्यांची संख्या कमालीची वाढल्याने मनपाच्या अंगणवाड्यांमध्ये मुलांना टाकण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. महापालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये मानधन तत्त्वावर ३१० अंगणवाडीसेविका, २८८ मदतनीस व सहा मुख्यसेविका सद्य:स्थित कार्यरत आहेत. दरम्यान, मुलांची संख्या रोडावल्याने महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून शहरातील अंगणवाड्यात येणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. घटलेल्या संख्येवरून अंगणवाडीसेविकांसह मदतनिसांना कमी केले जाणार आहे. मनपाच्या समाज कल्याण विभागांतर्गत अंगणवाड्यांचा विषय येतो. १९९४ पासून सेविका व मदतनीस मानधन तत्त्वावर काम करत आहे. मात्र अंगणवाड्यांमध्ये मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण देऊन त्यांना कमी केले जाणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये अंगणवाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले जाणार असून, दीड ते दोन आठवडे सदर सर्वेक्षण पूर्ण होईल. मुख्यसेविकांसाठी आठ हजार पाचशे रुपये, सेविकेला सात हजार ६२०, तर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेला सात हजार रुपये दिले जातात.
मनपाच्या अंगणवाड्यांमधील मुलांची संख्या घटली आहे का, याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. पटसंख्या घटल्याचे समोर आल्यावर सेविका, मदतनिसांची कपात केले जाईल.
-नितीन नेर, उपायुक्त, समाज कल्याण, मनपा