रुग्णसंख्या घटतेय; तरीही बेडसाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:42+5:302021-05-04T04:06:42+5:30
निफाड तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत असली, तरी तालुक्यातील कोविड उपचार केंद्र व रुग्णालयात रुग्णांना जागा उपलब्ध ...
निफाड तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत असली, तरी तालुक्यातील कोविड उपचार केंद्र व रुग्णालयात रुग्णांना जागा उपलब्ध होत नाही. आजही खासगी रुग्णालयात बेडस मिळत नाहीत, तसेच रेमडेसिविर व ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडत आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे वैद्यकीय रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. ऑक्सिजनची सिलिंडर्स मिळत नाहीत. त्यासाठी बरेच परीश्रम घ्यावे लागतात, परंतु तेच रेमडेसिविर रुग्णांचे नातेवाईक काळ्या बाजारात आठ ते दहा हजार रुपये मोजून अवघ्या एक तासात आणतात. तोच अनुभव ऑक्सिजनचे सिलिंडर्सबाबतही आहे. त्यामुळे तालुक्यात अद्यापही रेमडेसिविर आणि ऑक्सिजन सिलिंडर्सचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सर्रास होत असताना, अन्न आणि औषध खाते व पोलीस यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
आजही निफाड तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथम क्रमांकावर असली, तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवरून थेट ८३ टक्केपर्यंत गेले आहे. दि. १ मे अखेर निफाड तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या १५ हजार २२८ रुग्ण असून, १२ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णाचा बरे होण्याचा दर ८१,६७ टक्के असून, आतापर्यंत ४६४ नागरिकांचे मृत्यू झाल्याची माहिती तालुका कोरोना संपर्क अधिकारी डाॅ.चेतन काळे यांनी दिली आहे.
इन्फो
बाजार समित्या बंद
निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, निफाड, सायखेडा व विंचुर येथील बाजार आवारांवर दररोज कांदा व शेतीमालाचे लिलाव होतात. यामुळेही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच लासलगाव येथील बाजारपेठेत सलग दोन आठवडे तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीने एक सप्ताह लिलाव बंद ठेवले आहेत. दरम्यान, गावोगावी जनता कर्फ्यू पाळला जात आहे, तसेच तालुक्यातील कोरोना देखभाल केंद्र वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
-----------------इन्फो
तालुक्यातील रुग्णसंख्या
२६ एप्रिल : ३,६२८
२७ एप्रिल : ३,४३१
२८ एप्रिल : ३,४२५
२९ एप्रिल : २,८८०
३० एप्रिल : २,५५३
१ मे : २,३२६
२ मे २,४२१
३ मे २,३५६