चित्रकला परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:39 AM2017-09-24T00:39:23+5:302017-09-24T00:39:28+5:30
दहावीच्या परीक्षेच्या निकालात चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण एकूण टक्केवारीत घेण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना राज्यभरात दुपटीने विद्यार्थी संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यभरातून सुमारे चार लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले होते, तर यावर्षी सुमारे सात लाख विद्यार्थी या परीक्षा देत असल्याची माहिती राज्य कला संचालनालयाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक सुरेश पवार यांनी दिली.
साहेबराव अहिरे ।
पाथर्डी फाटा : दहावीच्या परीक्षेच्या निकालात चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण एकूण टक्केवारीत घेण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना राज्यभरात दुपटीने विद्यार्थी संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यभरातून सुमारे चार लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले होते, तर यावर्षी सुमारे सात लाख विद्यार्थी या परीक्षा देत असल्याची माहिती राज्य कला संचालनालयाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक सुरेश पवार यांनी दिली. राज्य शासन अलीकडे शिक्षण क्षेत्रात नवनवे प्रयोग करताना व तसे नियम करून ते अमलात आणताना दिसून येत आहे. अशातलाच एक प्रयोग म्हणजे चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण दहावीच्या एकूण टक्केवारीत ग्राह्य धरण्याचा आहे. मार्च २०१७ च्या परीक्षेत हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र त्याच्या मलबजावणीतल्या गोंधळामुळे पालक व विद्यार्थ्यांपर्यंत तो नीट पोहचला नाही. मात्र चालू शैक्षणिक वर्षात त्याची उपयुक्तता शिक्षक, शाळा, विद्यार्थी व पालकांच्या चांगलीच लक्षात आली आहे. चित्रकला विषयाच्या राज्य शासनाच्या कला संचालनालयामार्फत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन परीक्षा घेतल्या जातात. त्यातील इंटरमिजिएट परीक्षेला विद्यार्थ्यांना सी ग्रेड मिळाल्यास पाच गुण, बी ग्रेड मिळाल्यास पंधरा गुण त्या विद्यार्थ्याच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांमध्ये अधिकचे म्हणून मिळविले जाणार आहेत. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढून पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी होणार आहे. ही बाब लक्षात आल्याने यावर्षी सुमारे पंचेचाळीस टक्के अधिक विद्यार्थी राज्यभरातून या परीक्षांना प्रविष्ट झाले आहेत. २१ सप्टेंबरपासून सदर परीक्षा राज्यभर सुरू झाली असून, रविवारी (दि.२४) परीक्षेचे शेवटचे पेपर होणार आहेत. अलीकडच्या काही वर्षांत दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांची फुगलेली टक्केवारी पाहून व त्यावर सर्वत्र झालेली टीका लक्षात घेता शासनाने पुढील वर्षांपासून भाषा विषयाचे तोंडी परीक्षांचे शाळांकडे असलेले गुण रद्द करून पूर्ण शंभर गुणांची परीक्षा घेण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र दुसरीकडे चित्रकलेचे गुण ग्राह्य धरण्याच्या धोरणामुळे शासन या ना त्याप्रकारे विद्यार्थ्यांची टक्केवारी फुगविण्याचाच प्रयत्न करीत असल्याचा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे चित्रकला विषयाच्या ग्रेड परीक्षांचे गुण दहावीच्या टक्केवारीत धरण्याचे धोरण राबविणे सुरू केल्याने चित्रकला शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान असले तरी त्या विषयाच्या तासिका कमी करण्यात आल्याने सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. शासन चित्रकलेच्या गुणांना व विषयाला महत्त्व देताना तासिका का कमी करताय हे मात्र गूढ आहे.