सिन्नर, नांदगावला वाढली टॅँकर्सची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:18 AM2019-04-23T01:18:07+5:302019-04-23T01:18:22+5:30
उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत.
नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टॅँकर्सच्या संख्येत वाढ झाली असून, सिन्नर आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅँकर्सची संख्या झाली आहे. जिल्ह्णात २६८ टॅँकरद्वारे गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
कमी पर्जन्यमानामुळे यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, पाणी टॅँकर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णात २० टॅँकर्सची संख्या वाढली असून, सिन्नर आणि नांदगावमध्ये सर्वाधिक ५१ टॅँकर्स सुरू आहेत. त्याबरोबरच मालेगाव आणि येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांमध्ये टॅँकर्सची मागणी वाढली आहे. आणखी काही तालुक्यांमधून टॅँकर्सच्या मागणीची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात पाणीपुरवठा करणाऱ्या २१८ टॅँकर्सची संख्या आता २३८ वर पोहचली आहे. टॅँकरची ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.
गेल्या १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात २१८ टॅँकर्सद्वारे गाव आणि वाड्यांना ८४० ठिकाणी पाणीपुरवठा केला जात होता. आताही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या टॅँकरची मागणी गावागावातून होऊ लागली आहे. जिल्हाभरातून आलेल्या मागणीनुसार गेल्या आठवड्यात २० टॅँकर्स वाढविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेली टॅँकर्सची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून मागणी केलेल्या गावांना तत्काळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशीदेखील मागणी नोंदविण्यात आलेली आहे. पाण्याची समस्या वाढत असताना ज्या गावांना पारंपरिक जलस्रोताच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता यातील काही स्रोतांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने या गावांचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्णाची भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
अतिसाराची भीती अधिक
ज्या गावांचा जलस्रोत आटला आहे आणि अशाही परिस्थितीत तेथून पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे अशा गावांमध्ये अतिसाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा जलस्रोतावरचे पाणी पिण्यायोग्य झाल्याशिवाय वापरू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. आटलेल्या जलस्रोतांबरोबरच आता अन्य जलस्रोत शोधण्याच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे.
च्दिवसेंदिवस पर्जन्यमानाचे खालावत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे जाणवणारा तीव्र उन्हाळा यामुळे जिल्ह्णातील दुष्काळी परिस्थिती भीषण होत आहे. जिल्ह्णातील विविध तालुक्यांमध्ये भूजल पातळीने नीचांकी गाठली आहे. सिन्नर, सटाणा, मालेगाव, कळवण यांसारख्या तालुक्यांमधील भूजल पातळी कमी झाली आहे.