तब्बल पावणेदोन वर्ष केली ८० वर्षांच्या अज्ञात वृद्धेची शुश्रूषा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:21+5:302021-07-30T04:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात सीबीएसबाहेर बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका अज्ञात वृद्धेला १०८ च्या ॲम्ब्युलन्सने जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात सीबीएसबाहेर बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका अज्ञात वृद्धेला १०८ च्या ॲम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयात आणून सोडले. त्या जर्जर, बेशुद्धावस्थेतील वृद्धेला सिव्हिलच्या इन्फेक्शस वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर या वॉर्डमधील ७ सिस्टर आणि एक त्यांच्या प्रमुख, अशा ८ जणींनी त्या वृद्धेची एक- दोन महिने नव्हे, तर तब्बल पावणेदोन वर्ष सेवा करून तिला चालते, फिरते केले. त्यानंतर गुरुवारी (दि.२९) सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिलासा या वृद्धांच्या निवारा केंद्राकडे सुपुर्द करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात ॲम्ब्युलन्सने आणल्या गेलेल्या या आजीबाईंना प्रारंभीचे तीन-चार दिवस शुद्धच नव्हती. सलाइनसह अन्य औषधाेपचार केल्यानंतर, तसेच नाकातून दूध वगैरे दिल्यानंतर या आजींना थोडीशी शुद्ध आली. वयोमानामुळे ऐकूच येइनासे झाले होते, तसेच शारीरिक विधीदेखील बेडवरच सुरू होते. मात्र, तरीही या वॉर्डमधील सर्व सिस्टरनी जणू आपल्याच कुटुंबातील कुणी ज्येष्ठ महिला असल्याप्रमाणे डायपर लावण्यापासून अन्य सर्व प्रकारची सेवा केली. दीड- दोन महिन्यानंतर आजीबाईंची तब्येत सुधारू लागली. त्यांना नाव, गाव विचारले तरी प्रारंभीचे काही दिवस सांगता येत नव्हते. काहीतरी नांदुर्डी, उगाव वगैरे गाव आणि गांगुर्डे, असे आडनाव सांगायच्या. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिकडेही चौकशी केली. मात्र, त्यांचे जवळचे नातेवाईक कुणीच नव्हते. एक लांबची नातेवाईक महिला असल्याचे समजल्यावर तिच्याशी संपर्क साधला. मात्र, ती खेडूत महिला गरीब आणि घरी पुरुषमाणूस कुणीच नसल्याने तिनेदेखील सांभाळायला नकार दिला. त्यामुळे सर्व प्रयत्न थांबले. त्याचदरम्यानच्या काळात कोरोना सुरू झाल्याने या वृद्धेला कोणत्याही अनाथाश्रमात सांभाळायलाही कुणी घेत नव्हते. त्यामुळे अखेर तब्बल पावणेदोन वर्ष या आजीबाईंना सिव्हिलच्या या नर्सेसनीच सांभाळले.
इन्फो
या आठ सिस्टर्सनी सांभाळले
इन्फेक्शन वॉर्डमधील सिस्टर मीना भोसले, शैलजा साबळे, सविता ओढेकर, भारती ढाके, संगीता अहिरे, माधवी मेतकर, माधवी हरगुडे आणि त्यांच्या प्रमुख राबिया पठाण या सर्वांनी मिळून त्यांची सेवा शुश्रूषा केली. प्रसंगी चमच्याने दूध पाजण्यापासून हाताने खाऊ घालण्यापर्यंत सर्व प्रकारची सेवा केली. कोरोनाकाळातही आजीबाईंना वॉर्डबाहेर येऊ न देता त्यांची काळजी घेतली. त्यामुळे या विभागातील सर्व सिस्टर, वॉर्डबॉय यांचेही जिल्हा शल्यचिकित्सक आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
फोटो
२९आजी