जिल्ह्यात ‘पोषण आहार’ सप्ताहाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:00 AM2020-09-11T00:00:54+5:302020-09-11T00:45:40+5:30
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून छोट्या गटांमध्ये उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून व नियमांचे पालन करून छोट्या गटांमध्ये उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येते. ३० सप्टेंबरपर्यंत चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून, मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी व माता व बालकाचे पोषण योग्यरीत्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य जीवनन्नोती अभियांनातर्गत कार्यरत ग्रामसंघानाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश तालुका व ग्रामस्तरीय यंत्रणेला देण्यात आले असून, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आणि आरोग्य सेविका यांच्या समन्वयातून ग्रामस्तरावर अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.
पोषण अभियानात पोषण आहार व त्याचे महत्त्व, अनेमिया आजार, गरोदर व स्तनदा माता यांच्याकडे गृहभेटी करणे, ० ते ६ वर्ष वयोगटांतील बालकांचे वजन व उंचीचे मापन करणे, अंगणवाडी केंद्रांच्या आवारात परसबागांची निर्मिती करणे, छोट्या गटांमध्ये अल्प व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांची बैठक घेणे, लसीकरण करणे आदी विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार असून, गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी याचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्विनी आहेर यांनी दिली.एक मूठ पोषण उपक्रमएक मूठ पोषण उपक्रमांतर्गत मध्यम व तीव्र वजगटातील बालक, मध्यम व तीव्र कुपोषित श्रेणीतील बालक, गरोदर माता यांच्यासाठी दररोज ५ मि.ली. खोबरेल तेल, १ उकडलेला बटाटा, १ अंडी, २० ते ४० ग्रॅम मोड आलेले कडधान्य, मुठभर चणे, फुटाणे, गूळ देण्यात येणार आहे. यामुळे बालक तसेच मातांचे पोषण होण्यास मदत होणार असून, यामध्ये ग्रामपंचायतीही सहभागी आहेत.