आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण
By admin | Published: October 19, 2015 10:32 PM2015-10-19T22:32:45+5:302015-10-19T22:33:29+5:30
आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण
नाशिक : नवीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) धोरणामध्ये सरकारने नोंदणीकृत उद्योगांना सवलतीच्या दरात वीज, तसेच वाढीव चटई क्षेत्रासह विविध सवलतींचा अंतर्भाव केल्यामुळे या उद्योगासाठी पोषक वातावरण तयार होत आहे़ सरकारच्या या धोरणामुळे येत्या काही वर्षांत या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन उद्योग सहसंचालक बळवंत जोशी यांनी केले़
गंगापूर रोडवरील कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय व नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रीज अॅण्ड एक्सपोटर््स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयटी पॉलिसी- २०१५’ या विषयावरील चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते़
एनडीआयईएचे अध्यक्ष रमेश पवार यांनी सांगितले की, मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये आयटी उद्योग फारसा विकसित होऊ शकला नाही. मात्र सरकारच्या नवीन सकारात्मक धोरणामुळे आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आयटी उद्योगाच्या विस्तारासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व आयटी उद्योजक यांच्या एकत्रित प्रयत्नाची आवश्यकता आहे़ या उद्योगाच्या विकासासाठी सरकारकडेही पाठपुरावा करण्याचे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले़
आयटी उद्योगासाठी आवश्यक असलेले कम्युनिकेशनचे जाळे विस्तारण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) प्रयत्नशील असून, शहरात तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार करण्याचे काम सुरू असल्याचे महाव्यवस्थापक सुरेश बाबू प्रजापती यांनी यावेळी दिली. या चर्चासत्रामुळे आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली होती़
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार, बँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक प्रताप मोहंती, मविप्रचे शिक्षण अधिकारी रामनाथ चौधरी उपस्थित होते. या चर्चासत्राला विद्यार्थी व आयटी क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)