नायलॉन मांजाने तब्बल २८ पक्षी जायबंदी तर दोन मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 07:16 PM2020-01-15T19:16:08+5:302020-01-15T19:18:21+5:30
नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी स्वत:हून टाळावा यासाठी शाळांपासून विविध शासकीय यंत्रणांपर्यंत सर्वच स्तरांमधून जनजागृती केली जाते.
नाशिक : नायलॉन मांजावर कायदेशीर बंदी असतानाही चोरट्या मार्गाने मांजाची विक्री करत विक्रेत्यांनी व्यवसाय केला तर काही असंवेदनशील नागरिकांनी चोरीछुप्या पध्दतीने खरेदी करून पतंगबाजीची हौस भागविली; मात्र त्यांची ही हौस संक्रांतीच्या दिवशी बुधवारी (दि.१५) २८ पक्ष्यांच्या जीवावर बेतली. नायलॉन मांजाने कुणाचे पंख कापले गेले तर क ाही पक्ष्यांची चोच, पायांना दुखापत झाली. एका कबुतरासह वटवाघळाला आपले प्राण गमवावे लागले.
नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांसाठीदेखील तितकाच घातक ठरतो. यामुळे कायद्याने नायलॉन मांजाविक्री-वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नायलॉन मांजाचा वापर नागरिकांनी स्वत:हून टाळावा यासाठी शाळांपासून विविध शासकीय यंत्रणांपर्यंत सर्वच स्तरांमधून जनजागृती केली जाते. पर्यावरणप्रेमी संस्थांकडूनदेखील याबाबत प्रबोधन करण्यात आले; मात्र तरीही शहराच्या गावठाण भागासह उच्चभ्रू परिसरांमध्येही नायलॉन मांजाद्वारे पतंगबाजीची हौस भागविली गेली. परिणामी मकरसंक्रांतीच्या दिवसाचा सुर्यास्त होताना एकूण २८ पक्षी जायबंदी झाले. तर दोन पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुक्या जीवांसाठी मकरसंक्रांत गोड कधी ठरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पतंगबाजी करताना काही असंवदेनशील मनाच्या हौशी लोकांनी हातात नायलॉन मांजाची फिरकी धरल्याने खुल्या आकाशात मुक्तपणे विहार करणाऱ्या पक्ष्यांचा जीव धोक्यात आला. काही पक्ष्यांचे पंख असे कापले गेले की ते आता भरारी घेऊ शकणार नाही. तर सुदैवाने काही पक्षी किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याने पक्षीमित्रांनी त्यांच्यावर उपचार करून पुन्हा निसर्गात मुक्त केले. पक्षी जखमी होण्याच्या घटना दिवसभर शहरासह विविध उपनगरांमध्ये घडत होत्या.
पर्यावरणप्रेमींसह अग्निशमन दलाची ‘रेस्क्यू’साठी धाव
इको-एको फाउण्डेशन या वन्यजीवप्रेमी संस्थेचे सुमारे सहा ते सात स्वयंसेवक विविध भागात लक्ष ठेवून होते. जखमी पक्ष्यांना रेस्क्यू करत त्यांना अशोकस्तंभावरील पशुवैद्यकिय दवाखान्यापर्यंत पोहचविणे व सुश्रूषा करण्याची जबाबदारी या संस्थेच्या स्वयंसेवकांनी पार पाडली. पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन वेंदे, डॉ. संदीप पवार, डॉ. वैशाली थोरात यांनी उपचार केले.अग्निशमन केद्रांचे दुरध्वनी खणखणत होते. सिडको उपकेंद्रांने दोन, मुख्यालयाच्या केंद्राच्या जवानांनी एकूण चार पक्ष्यांना जीवदान दिले. पक्षी नायलॉन मांजाच्या सापळ्यात अडकून जखमी होण्याच्या घटना अधिक वाढण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.