नायलॉन मांजाने घेतला दुचाकीस्वार महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:34+5:302020-12-30T04:19:34+5:30
सातपूर येथील एका खासगी कंपनीतून दिवसभराचे काम आटोपून भारती मारुती जाधव (४६,रा. सिद्धिविनायक टाउनशिप, साईनगर, अमृतधाम) या त्यांच्या ॲक्टिवा ...
सातपूर येथील एका खासगी कंपनीतून दिवसभराचे काम आटोपून भारती मारुती जाधव (४६,रा. सिद्धिविनायक टाउनशिप, साईनगर, अमृतधाम) या त्यांच्या ॲक्टिवा दुचाकीने (एम.एच.१५. ५९५४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी जात होत्या. द्वारका चौकातून त्यांनी उड्डाणपुलावरून दुचाकी नेली असता, काही अंतर पुढे जात नाही, तोच हवेत तुटून आलेल्या नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच, तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले. यावेळी डॉक्टरांनी रुग्णालयात आल्यानंतर तपासून जाधव यांना मयत घोषित केले. जाधव यांच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने अमृतधाम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जाधव यांच्या पश्चात आईसह सहा वर्षांचा मुलगा प्रथमेश, दोघे भाऊ असा परिवार आहे. जाधव यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या मासिक पगारावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या मृत्यूने जाधव यांच्या आई व मुलाला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती समजताच, त्यांच्या वृद्ध आईने जिल्हा रुग्णालयात दाखल होताच, मृतदेहाजवळ टाहो फोडला.
---इन्फो--
नायलॉन मांजा ठरतोय कर्दनकाळ
नायलॉन मांजाविक्री व वापरावर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पतंगबाजीला उधाण येते. यंदा पतंगबाजीची हौस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे अधिक भागविताना तरुणाई नजरेस पडत आहेत. अद्याप संक्रांतीला पंधरवडा शिल्लक असतानाही आकाशात मोठ्या संख्येने पतंग दिवसभर उडताना नजरेस पडतात. या पतंगबाजीमध्ये आपली पतंग लवकर कापली जाऊ नये, यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. मात्र, हा नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांच्याही जिवावर बेतू लागला आहे.
----
फोटो आर वर २८भारती नावाने सेव्ह आहे.