नायलॉन मांजाला मिळतोय ‘ढील’; विक्री छुपी अन् धोका उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:49+5:302021-01-03T04:15:49+5:30
नाशिक : शहर व परिसरात नायलॉन मांजा विक्री, वापराविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असला, तरीही अद्यापही शहरांसह विविध ...
नाशिक : शहर व परिसरात नायलॉन मांजा विक्री, वापराविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असला, तरीही अद्यापही शहरांसह विविध उपनगरांमध्ये नायलॉन मांजा व त्यासारखाच त्याला पर्यायी ठरणारा घातक असा मांजाला सर्रासपणे ‘ढील’ दिला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या सोमवारी दुचाकीस्वार महिलेचा या नायलॉन मांजामुळे नाहक बळी गेला. यानंतर, शहराच्या जिल्हा व पोलीस प्रशासनासह मनपा प्रशासनही खडबडून जागे झाले खरे. मात्र, चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा, तसेच बारातारी मांजा, काचेचा मांजा अजूनही पतंगबाजी करणाऱ्यांच्या हातात सोपविला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
नायलॉन मांजाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांनीही शहर व परिसरात नायलॉन मांजाची विक्री, वापरावर कडक बंदी घातली आहे, तरीही चोरीछुप्या मार्गाने नायलॉन मांजासह काचेचा वापर केलेला मांजाही विक्री केला जात आहे. केवळ पाच रुपयांची पतंग कापली जाऊ नये आणि ‘पेच’ जिंकता यावा, यासाठी काही पतंगबाजी करणारी मंडळी या प्रकारच्या मांजाला प्राधान्य देत आहेत, हे दुर्दैव.
आपली पतंग आकाशात सुरक्षित राहावी, यासाठी नायलॉन मांजाचा केला जाणारा वापर मात्र, मनुष्यासह मुक्या पक्ष्यांसाठी असुरक्षित ठरत आहे. पतंगबाजीची हौस भागविताना व तो क्षणिक आनंद लुटताना इतरांच्या आयुष्य आपण धोक्यात घालत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. आगामी काही दिवसांत या प्रमाणात अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे शासकीय यंत्रणेला अधिक सतर्क राहून लवकरात लवकर शहरात नायलॉन व काचेच्या मांजाची छुपी साठवणूक व विक्री उधळून लावावी लागणार आहे. याबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
----इन्फो---
तीन वर्षांत ५३० पक्ष्यांना बसला फास
२०१८ सालापासून २०२०अखेरपर्यंत शहरात तब्बल ५३० पक्ष्यांना नायलॉन मांजाचा फास बसला असून, यामधील बहुतांश पक्षी गंभीर जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले, तर काहींचा मृत्यूही झाला. नाशिकच्या जैवविविधतेच्या दृष्टीने ही मोठी हानी आहे. २०१८ व १९ सालाच्या तुलनेत गेल्या वर्षी २०२०मध्ये तब्बल २१५ पक्षी नायलॉन मांजामध्ये अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत नायलॉन मांजामध्ये उलटले लटकलेल्या पक्ष्यांची झाडांच्या फांद्यांवरुन तसेच वीजतारांवरून महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुटका केली.
---इन्फो--
विक्रेत्यांविरुध्द गुन्हे दाखल
नायलॉन मांजाची विक्री करताना, तसेच विक्रीच्या उद्देशाने साठ केल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल केले जात आहे. कलम-१८८नुसार पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच परिमंडळ-२मधील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी माेहीम राबवून ४८ रीळ जप्त केले, तसेच पाच संशयित विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली.
--कोट---
नायलॉन मांजाचा घाव हा अत्यंत जीवघेणा असून, या मांजाची विक्री थांबविण्यासाठी शहरात पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये सर्व पोलीस ठाण्यांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे, तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनाही आदेशित करण्यात आले असून, साध्या वेशात गस्त करत गोपनीय माहितीच्या आधारे नायलॉन मांजा विक्रीची छुपी ठिकाणे उद्ध्वस्त केली जाणार आहे. सूज्ञ नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा.
- संग्रामसिंह निशाणदार, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा
---कोट--
नायलॉन मांजामुळे पक्षी केवळ जानेवारी महिन्यात जायबंदी होतात असे नाही, तर हा मांजा वर्षभर पक्ष्यांसाठी सापळा ठरत असतो. वातावरणात मांजा कुजत नसल्याने झाडांच्या फांद्यावर, तसेच अन्य ठिकाणी पक्षी जेव्हा बसतात, तेव्हा त्यांच्या पंखांमध्ये किंवा पायांमध्ये नायलॉनचा मांजाचा फास अडकतो आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना वर्षभर घडत असतात. त्यामुळे पतंगबाजीची जीवघेणी हौस आता थांबवायला हवी.
-शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी
-----------
पॉइंटर्स- गेल्या वर्षी झालेले अपघात- ६८
मांजामुळे जखमी पक्षी-१५०
जखमी व्यक्ती- ११
---सुचना----
डमी फॉरमेट आर वर ०२चायनिज मांजा नावाने आरवर सेव्ह आहेत
तसेच ०२ मांजा व ०२ काइट नावाने फटोसुध्दा आर वर सेव्ह आहेत.