नायलॉन मांजाबंदी केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:16 AM2021-01-04T01:16:03+5:302021-01-04T01:16:45+5:30
गोदाकाठ परिसरात चायना आणि नायलॉन मांज्याचा निर्मितीसह वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर व विक्री सर्रासपणे सुरू आहे.
सायखेडा : गोदाकाठ परिसरात चायना आणि नायलॉन मांज्याचा निर्मितीसह वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर व विक्री सर्रासपणे सुरू आहे.
चायना मांज्यामुळे राज्यात काही मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पक्षासाठी नायलॉन मांजा हा मृत्यूचा सापळा ठरल्याने त्याच्या वापरासह विक्रीवर बंदी आली होती. मात्र शहर व ग्रामीण परिसरात नियमाला धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. नायलॉन मांज्यावर बंदी केवळ कागदावरच का, असा सवाल संतप्त पर्यावरणप्रेमींसह नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मनुष्यापासून ते पक्ष्यापर्यंत जीवघेण्या ठरलेल्या नायलॉन मांज्यावरील बंदी असताना शहरात व ग्रामीण परिसरात सर्रासपणे विक्री व वापर सुरू आहे. नायलॉन मांजा हा पक्ष्यासाठीच नव्हे तर लहान मुले, रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या माणसांना घातक ठरत आहे. दरवर्षी या मांज्यामुळे पाय तुटून निकामी झालेले अक्षरशः झाडाला उलटे लटकून हजारो पक्ष्यांचे प्राण गेले आहेत. नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांना जीव गमवावा लागत असेल तर यावर चिंतन व्हायला हवे. यामुळे मनुष्य जीवाचे आणि मुक्या प्राण्यासह पक्ष्यांचे जीव वाचतील त्यामुळे या मांज्यावर धडकपणे बंदी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नायलॉन मांजा विक्रीवर व वापरावर जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण परिसरात पतंगबाजीला उधाण येते. यंदा पतंगबाजीची हौस शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे अधिक भागविताना तरुणाई नजरेस पडत आहेत.
अद्याप मकारसंक्रातीला बारा दिवस पुढे असला तरी शिल्लक असतानाही आकाशात मोठ्या संख्येने पतंग दिवस भर उडतांना नजरेस पडतात. या पतंगबाजीमुळे आपली पतंग लवकर कापली जाऊ नये यासाठी नायलॉन मांज्याचा वापर केला जात असतो. मात्र हा नायलॉन मांजा पक्ष्यांसह माणसांच्याही जीवावर बेतू लागला आहे. धडक कारवाई होणे गरजेचे आहे.