नायलॉन मांजाने कबुतर जायबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:21 AM2017-10-24T00:21:49+5:302017-10-24T00:22:49+5:30
पंचवटी मनपा विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळ वृक्षावर असलेल्या नायलॉन मांजाचा फास बसल्याने कबुतर जायबंदी झाल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी कबुतराचे प्राण वाचविले. मकर संक्रांतीच्या औचित्यावर तरुणाईकडून पतंग उडविण्याची हौस पूर्ण केली जाते; मात्र यावेळी पतंग कापली जाऊ नये, म्हणून बहुतांश तरुण नायलॉन मांजाचा वापर करतात. हा मांजा वर्षानुवर्षे झाडांवर कायम राहतो. त्याचा त्रास वर्षभर पक्ष्यांना सहन करावा लागतो.
नाशिक : पंचवटी मनपा विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळ वृक्षावर असलेल्या नायलॉन मांजाचा फास बसल्याने कबुतर जायबंदी झाल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी कबुतराचे प्राण वाचविले.
मकर संक्रांतीच्या औचित्यावर तरुणाईकडून पतंग उडविण्याची हौस पूर्ण केली जाते; मात्र यावेळी पतंग कापली जाऊ नये, म्हणून बहुतांश तरुण नायलॉन मांजाचा वापर करतात. हा मांजा वर्षानुवर्षे झाडांवर कायम राहतो. त्याचा त्रास वर्षभर पक्ष्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे वर्षभर पक्ष्यांवर संंक्रांत ओढावलेली असते; मात्र नायलॉन मांजावर बंदी घालूनदेखील त्याचा वापर अद्याप थांबत नसल्यामुळे सातत्याने मांजामध्ये पक्षी अडकण्याच्या घटना शहर व परिसरात सुरूच आहे. पिंपळाच्या झाडावर पडलेल्या नायलॉन मांजात कबुतर अडकला. यावेळी पंखांना फास बसल्यामुळे कबुतर हवेत उलटा लटकून मृत्यूशी झुंज देत होता. सदर बाब काही वेळेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांच्या लक्षात आली. यावेळी वाहनतळात उभ्या असलेल्या बंबांपैकी एक बंब जवानांनी झाडाजवळ आणला व बंबावरून बांबूची आकडी लावून मांजाच्या फासातून कबुतराची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. काही मिनिटं प्रयत्न केल्यानंती फास सुटला; मात्र कबुतराचे पंख जायबंदी झाल्यामुळे कबुतर जमिनीवर कोसळू लागल्याचे लक्षात आल्यानंतर खाली उभ्या असलेल्या तरुणांनी त्याला झेलले.