नायलॉन मांजाने कापला पारवा

By admin | Published: January 15, 2017 01:09 AM2017-01-15T01:09:37+5:302017-01-15T01:09:55+5:30

वाचले प्राण : अग्निशामक, महावितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता

Nylon Chop Cut Off | नायलॉन मांजाने कापला पारवा

नायलॉन मांजाने कापला पारवा

Next

नाशिक : मकरसंक्रांतीचा उत्साह शहरात सर्वत्र शिगेला पोहचला आणि आकाश रंगीबेरंगी पतंगींनी व्यापले गेले. विविध हिंदी-मराठी गीतांच्या तालावर तरुणाई पतंगबाजीचे शौर्य दाखविण्याचा प्रयत्न करत असताना एक पारवा नायलॉन मांजाच्या फासात अडकून तडफडत झाडाला उलटा टांगला गेला. या मुक्या पक्ष्याच्या वेदना मात्र ‘त्या’ नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना कळणार का असा संतप्त सवाल यावेळी जमलेल्या संवदेनशील मनाच्या माणसांनी उपस्थित केला.
नायलॉन मांजाचा वापरावर व विक्रीवर शहरात बंदी घातली गेली असून, पोलिसांनी ठिकठिकाणी धाडी टाकून नायलॉन मांजा जप्त करण्याची कारवाईदेखील केली; मात्र चोरीछुप्या पद्धतीने काही बहाद्दरांनी पतंगबाजीचे शौर्य दाखविण्यासाठी हातात नायलॉनचा मांजा घेण्याचे धाडस केले आणि हे त्यांचे धाडस बेतले त्या मुक्या पारवा जातीच्या पक्ष्यावर. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राका कॉलनी परिसरातील एका झाडाला पारवा नायलॉन मांजामुळे उलटा टांगला गेला होता. झाड उंच असल्यामुळे पारव्याच्या मदतीसाठी निघणारा आवाजही कोणाच्या लक्षात लवकर आला नाही. दरम्यान, काही पादचाऱ्यांची अचानकपणे या लटक लेल्या पारव्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी त्याच्या सुटकेसाठी तत्काळ अग्निशामक दलाची मदत मागितली.
क्षणार्धात शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयाचे जवान घटनास्थळी पोहचले. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित के ला. कारण झाडाजवळून अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्या गेल्या असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करणे गरजेचे होते. जवानांनी मोठ्या कौशल्याने झाडाला लटक लेल्या पारव्याला खाली उतरविले आणि त्याच्या पंखांना नायलॉन मांजाच्या फासामधून मुक्त केले. जवानांनी सुरक्षितपणे पारव्याला मुख्यालयात नेले व पक्षिमित्राकडे त्याला उपचारार्थ सोपविले. (प्रतिनिधी)नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांनी नायलॉन मांजा वापरावर बंदी केली असली तरी बहुतांशी नागरिकांकडून त्याचा सर्रास वापर होताना दिसत आहे. शनिवारी शरणपूररोड येथील झाडाला नायलॉन मांजामुळे अडकून एक कबुतर गंभीर जखमी झाले. जागरूक नागरिकांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्युत विभाग व अग्निशमन दलाला कळविले. या सतर्कतेमुळे कबुतराचा जीव वाचविण्यात यश आले असले तरी नागरिक या नायलॉन मांजाचा वापर कधी बंद करणार ही खंत आहे.

Web Title: Nylon Chop Cut Off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.