नायलॉन मांजाने कापला युवकाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:04 AM2018-12-14T01:04:49+5:302018-12-14T01:05:18+5:30
दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याची घटना सिन्नर शहरात बसस्थानका- जवळ घडली. नायलॉन मांजाने स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने युवकावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया केल्यानंतर युवकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती डॉ. संदीप मोरे यांनी दिली.
सिन्नर : दुचाकीने जात असताना नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याची घटना सिन्नर शहरात बसस्थानका- जवळ घडली. नायलॉन मांजाने स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने युवकावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया केल्यानंतर युवकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती डॉ. संदीप मोरे यांनी दिली.
माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या हिंदुस्तान युनिलिव्हर कारखान्यात नोकरीला असलेला व शहरातील एस.टी. कॉलनीत राहणारा उमाकांत मधुकर नवले (३२) हा युवक वडिलांचा जेवणाचा डबा घेऊन बसस्थानकात दुचाकीवरून आला होता. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बसमध्ये डबा ठेवल्यानंतर उमाकांत मोटारसायकलने गावठा भागाकडे जात असताना नाशिक-पुणे महामार्गावर नायलॉन मांजा उमाकांतच्या गळ्यात अडकला. धारदार मांजाने उमाकांतचा क्षणार्धात गळा कापला गेला. काही समजण्याच्या आत घडलेल्या प्रकाराने न डगमगता उमाकांतने दुचाकीवर स्वत:चा तोल सांभाळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतरही उमाकांतने हिंमत सोडली नाही.
घडलेला प्रकार पाहून राजेंद्र जगझाप व सोमनाथ बकरे हे मदतीला धावले. त्यानंतरही उमाकांतने दुचाकी चालवत जवळच असलेले यशवंत हॉस्पिटल गाठले. तोपर्यंत मोठा रक्तस्राव झाला होता. गळ्यातील स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. उमाकांत याचे थोरले बंधू प्रेस फोटोग्राफर कैलास नवले बाहेरगावी होते. मात्र नातेवाईक व मित्रांनी तातडीने निर्णय घेऊन उमाकांत याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दुपारनंतर उमाकांत याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. गळ्याला सुमारे ५० ते ६० टाके पडल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली. सुदैवाने श्वासनलिकेला दुखापत न झाल्याने अनर्थ टळला.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची गरज
नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. त्यानंतरही शहर व परिसरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याने दिसते. नायलॉन मांजा पक्ष्यांनाच नव्हे तर माणसांनाही जीवघेणा ठरतो; मात्र नगर परिषदेकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांना केवळ समज दिली जाते. नवले यांच्यावर बेतलेला प्रसंग गांभीर्याने घेऊन नगर परिषदेच्या पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.