नायलॉन मांजाने पक्ष्यांवर संक्रांत
By admin | Published: December 27, 2015 10:36 PM2015-12-27T22:36:59+5:302015-12-27T22:40:40+5:30
नायलॉन मांजाने पक्ष्यांवर संक्रांत
इंदिरानगर : मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने पक्ष्यांवर संक्रांत येत आहे. यावर्षीही सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. नायलॉन मांजावर बंदी फक्त कागदावरच दिसून येत आहे.
मकरसंक्रांत पतंग उत्सव असून यात बालक, युवक, युवती सहभागी होतात. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश भरून जाते. बाजारात मांजा आणि पतंगाची लाखो रुपयांची उलाढाल होते. पतंग उत्सवात एकमेकांची पतंग कापण्यासाठी स्पर्धा सुरू असते. त्यासाठी सर्वांत चांगल्या दर्जाचा मांजा घेण्यात येतो. यामध्ये नायलॉनच्या मांजाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. परंतु या मांजामुळे दरवर्षी मोटारसायकलस्वाराच्या गळ्यास, अंगास व तोंडास गंभीर दुखापत होते. तसेच वृक्षांनाही मोठ्या प्रमाणात नायलॉनचा मांजा अडकतो. त्यामध्ये पक्षी अडकून बऱ्याच वेळेस जखमी होतात प्रसंगी मृत्यूही पावतात. त्यामुळे नायलॉनच्या मांजावर बंदी घालण्यात आली. परंतु काही दुकानदार नायलॉन मांजा हा ग्राहकांना लपूनछपून सर्रासपणे विक्री करीत आहेत. त्यामुळे तपासणीच्या वेळी नायलॉन मांजा काही सापडत नाही. त्याची चढ्या भावाने विक्री सुरूच आहे. (वार्ताहर)