लठ्ठपणा पूर्णपणे बरा करणे शक्य : जयश्री तोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:43 AM2018-05-19T01:43:02+5:302018-05-19T01:43:02+5:30
नाशिक : लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक असून, मागील दशकामध्ये लठ्ठपणा हा आजार असल्याचे सिद्ध झाले आहे.
नाशिक : लठ्ठपणा हा शरीरासाठी धोकादायक असून, मागील दशकामध्ये लठ्ठपणा हा आजार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असून, तज्ज्ञ डॉक्टारांचे मार्गदर्शन आणि औषधोपचारासह योग्य आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये योग्य ते बदल घडवून आणल्यास लठ्ठपणावर पूर्णपणे मात करता येणे शक्य असल्याचे मत ओबेसिटी तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले आहे. गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत जयश्री तोडकर यांनी शुक्रवारी (दि. १८) अठरावे पुष्प गुंफले. दिवंगत उद्योजक रामनाथशेठ चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यक्ष ‘करुया लठ्ठपणावर मात’ या विषयावर बोलताना तोडकर यांनी जगभरात साथीप्रमाणे फैलावत असलेल्या लठ्ठपणाविषयी माहिती देत त्यावरील उपचार व उपायांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लठ्ठपणामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असून, हा आजार साथीसारखा पसरत असल्याने लहान मुलांमधील लठ्ठपणामध्ये भारत पहिल्या क्रमांकाच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विकसनशील व विकसित अशा दोन्ही देशांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. एकेकाळी कुपोषित देश असलेल्या भारताला आता लठ्ठपणाने ग्रासले आहे. या आजाराविषयी जनजागृती निर्माण होण्याची गरज असून, ही एक चळवळ होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले. त्यांनी माहितीपटाच्या माध्यमातून लठ्ठपणाग्रस्त व्यक्तींच्या समस्या व त्यांना येणाºया विविध अडचणींची माहिती दिली.