नाशिक मनपा आयुक्त मुंढे यांच्या वाहिन्यांवरील मुलाखतीला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:18 PM2018-08-29T17:18:18+5:302018-08-29T17:20:33+5:30
अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आल्यानंतर त्यांनी विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमधून भाजपासह अन्य नगरसेवकांना अप्रत्यक्षरीत्या टीका होऊ लागल्याने एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून मुंढे यांच्या मुलाखतीला आक्षेप घेण्यात आला असून यासंदर्भात राज्यशासनाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरूध्द सत्तारूढ भाजपाच्या पुढकाराने अविश्वास ठराव आणण्यात आला असून १ सप्टेंबर रोजी विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. दरम्यान, अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सातपूरच्या शिवाजी नगर भागातील रवी संपत पाटील या कार्यकर्त्याने थेट राज्याच्या सचिवांकडे तक्रार केली आहे. मुंढे यांच्या मुलाखती म्हणजे नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार अशाप्रकारे कोणत्याही अधिकाऱ्याला अशाप्रकारे आपली भूमिका जाहिर करण्याचा अधिकार आहे काय असा प्रश्न करण्यात आला आहे. संबंधीत अधिकारी प्रशासकिय सेवेतील असल्याने त्यांना वर्तवणूकीसंदर्भात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही नियमाने अशी जाहिररीत्या भूमिका घेणे आणि व लोकप्रतिनिधीस प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हेत्वारोप करण्याचे स्वातंत्र्य करण्याचे स्वातंत्र्य आहे काय याचा खुलासा करून कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.