डॉक्टरांचे क्लिनिक्स, पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:58 PM2017-11-24T23:58:01+5:302017-11-25T00:33:18+5:30
शहरातील गल्लीबोळात थाटण्यात आलेले डॉक्टरांचे क्लिनिक्स आणि रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, नाशिक प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट वेल्फेअर असोसिएशनने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला स्वत:हून पत्र देत तशी नोंदणी करण्याची गळ घातली आहे.
नाशिक : शहरातील गल्लीबोळात थाटण्यात आलेले डॉक्टरांचे क्लिनिक्स आणि रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, नाशिक प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट वेल्फेअर असोसिएशनने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला स्वत:हून पत्र देत तशी नोंदणी करण्याची गळ घातली आहे. शहरातील खासगी रुग्णालये, सोनोग्राफी सेंटर्स यावर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे नियंत्रण आहे. संबंधित रुग्णालये, सेंटर्स यांना महापालिकेकडे रितसर नोंदणी करणे आवश्यक असते. अनेक रुग्णालयांनी अद्यापही नोंदणीचे नूतनीकरण केलेले नसल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगितले जाते. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात वाढत चाललेल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी शहरातील क्लिनिक्स, पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेच्या कक्षेत आणण्याचा विचार वैद्यकीय विभागाकडून केला जात असून, त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शहरातील रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅबची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात बºयाच लॅब या अनधिकृत असल्याची चर्चा असून, त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर लूटही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. पॅथालॉजी लॅबसंदर्भात वाढत्या तक्रारींमुळे आता नाशिक प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट वेल्फेअर असोसिएशनने स्वत:हून पुढाकार घेत शहरातील पॅथालॉजी लॅब यांना नोंदणी करणे अनिवार्य करण्याची मागणी केलेली आहे. शहरात बेकायदेशीरपणे प्रॅक्टिस सुरू असल्याचा दावाही असोसिएशनने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात गल्लीबोळात थाटलेले क्लिनिक्स आणि पॅथालॉजी लॅब यांनाही नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्तांच्या मान्यतेनंतर तसा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.
सन २०१५पर्यंत क्लिनिक्सची नोंदणी
महापालिकेकडे यापूर्वी सन २०१५ पर्यंत क्लिनिक्सची नोंदणी केली जात होती. परंतु, ज्याठिकाणी रुग्ण उपचारासाठी दाखल होत नाहीत, केवळ तपासणी केली जाते. अशा क्लिनिक्सची नोंदणी बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार करणे अनिवार्य नसल्याचे पत्र शासनाच्या आरोग्य विभागाने महापालिकेला पाठविले होते. त्यानंतर, क्लिनिक्सची नोंदणी बंद आहे. मात्र, वाढते गैरप्रकार लक्षात घेता महापालिकेने पुन्हा या क्लिनिक्सला आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.