मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचे विस्मरण
By Admin | Published: November 18, 2016 11:44 PM2016-11-18T23:44:46+5:302016-11-18T23:56:16+5:30
नासीर सय्यद : तेरा पुस्तकांचे मराठी, हिंदी, उर्दूमध्ये लवकरच भाषांतर
नाशिक : स्वातंत्र्य लढ्यात सहभागी शेकडो मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अजोड आहे, मात्र दुर्दैवाने बोटावर मोजण्याइतकेच मुस्लीम स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांचे बलिदान व शौर्याची इतिहासकारांनी दखल घेतली. बहुसंख्य मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचे इतिहासकारांना विस्मरण झाल्याने त्यांची कामगिरी अद्याप पडद्याआडच राहिल्याची खंत आंध्र प्रदेशमधील साहित्यिक प्रा. नासीर सय्यद यांनी व्यक्त केली.
टिपू सुलतान यांच्या जयंती सप्ताहनिमित्त मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने सय्यद यांचे शहरात विविध ठिकाणी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘द इमोर्टल्स’ या पुस्तकात तब्बल १५५ मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीचा इतिहास इंग्रजी व तेलगू भाषेत सचित्र शब्दबद्ध केल्याची माहिती सय्यद यांनी दिली. स्वातंत्र्यसंग्रामात मुस्लिमांचे योगदान या विषयावर त्यांनी आतापर्यंत तेरा पुस्तके लिहिली आहेत. टिपू सुलतान यांच्याकडे म्हैसूरची सत्ता होती. त्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारून म्हैसूर सुरक्षित ठेवले. स्वातंत्र्य संग्रामात टिपू सुलतान यांचे योगदान अद्वितीय आहे. ‘म्हैसूर पुली टिपू’ नावाच्या स्वतंत्र पुस्तकात त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सय्यद यांनी यावेळी दिली. २०१४ साली प्रकाशित झालेल्या ‘द इमोर्टल्स’ या पुस्तकात १७५७ ते १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्यातील मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे. सय्यद यांच्या तेलगू, इंग्रजी भाषांत असलेल्या मुस्लीम स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास लवकरच मराठी, हिंदी व उर्दूमध्ये भाषांतरीत करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने घेतल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अजीज पठाण यांनी दिली.