अंबड लिंकरोडच्या अतिक्रमणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:10 AM2019-08-24T01:10:21+5:302019-08-24T01:10:39+5:30
सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली.
सातपूर : सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली. दरम्यान, महापालिकेने नोटिसा बजावल्यानंतर ७० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या वतीने येथील ६५३ पैकी २३० दुकाने वापरातील बदलामुळे सील करण्यात येणार आहे.
सातपूर-अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारातील सर्व्हे नंबर ४४० आणि ४४३ मध्ये अनधिकृत भंगार व्यवसाय, अनधिकृत बांधकामे वाढत गेल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र या व्यावसायिकांनी परत अतिक्रमण केल्याने पुन्हा पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेने या अतिक्रमणावर हातोडा टाकला होता. त्यानंतर महानगरपालिकेने ठिकठिकाणी फलक लावून पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करू नये, असे सूचित केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष करून या जागेवर पुन्हा विनापरवाना अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत.
महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची पूर्वतयारी केली असून, त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बोधिशरण सोनकांबळे, उपायुक्त जयश्री सोनवणे, कार्यकारी अभियंता राजू आहेर, उद्धव धर्माधिकारी, पी. बी. चव्हाण, सतीश हिरे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, अनिल नरसिंगे, सोमनाथ वाडेकर, रवींद्र धारणकर, एस. आर. पाटील, नितीन नेर, महेंद्र पगारे, सुभाष आहेर, संजय अग्रवाल, कैलास भागवत आदी वरिष्ठ अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात डिमार्केशन केलेल्या अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामांची पाहणी केली.
खासगी एजन्सी ठेवणार नजर
महापालिकेच्या ताज्या सर्वेक्षणानुसार चुंचाळे शिवारात ६५३ बेकायदेशीर भंगार दुकाने असून, अनेकांनी वापरात बदल केला आहे अशा २३० दुकानांना सील करून त्यांचा वापर बंद करण्यात येईल तसेच त्यांच्याकडून हमी घेण्यात येईल, उर्वरित ४२३ दुकाने मात्र हटविण्यात येणार आहे. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºयांवर त्याच वेळेस कारवाई करण्यात येणार आहे. शहरात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच करण्यात येणार आहे.
महापालिकेने २३५ अनधिकृत बांधकामांवर आणि १३५ बेकायदेशीर व्यवसायांवर डिमार्केशन करण्याची कार्यवाही केली आहे
२३५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असून, १३५ बेकायदेशीर व्यवसाय सील करण्यात येणार आहे.
सदर भंगार बाजारातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सोमवार, दि. २६ रोजी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.