पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:56 PM2020-02-12T22:56:57+5:302020-02-12T23:49:47+5:30
प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक मालिनी भट्टाचार्य यांनी केली. सुमारे २५ कोटींची कामे सुरू असून, ही सर्व कामे नगर परिषदेशी संबंधित असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांच्याकडे केली.
त्र्यंबकेश्वर : येथे सुरू असलेल्या प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक मालिनी भट्टाचार्य यांनी केली. सुमारे २५ कोटींची कामे सुरू असून, ही सर्व कामे नगर परिषदेशी संबंधित असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांच्याकडे केली.
भट्टाचार्य यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात होणारी कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश संबंधिताना दिले. तसेच मंदिराचे सौंदर्य कसे वाढेल, शहराच्या सौंदर्याला या नवीन कामाने लोक आकर्षित क से होतील याबाबत सूचना केल्या. प्रसाद कामांचा उद्देशच असा आहे की, तीर्थातून पर्यटनात रोजगाराला संधी मिळू शकेल. भाविक व यात्रेकरुंच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणे. या योजनेत देशातील फक्त आठच ठिकाणे निवडण्यात आली. त्यात महाराष्ट्रात केवळ दोन तीर्थस्थळांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने योजना निधी दिला; पण योजना राबविण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यानी त्र्यंबकेश्वर या यादीत समाविष्ट करण्यात आले. योजना राबविण्याचे निश्चित झाल्याने त्र्यंबकेश्वरच्या कामात जवळचे हनुमान जन्मस्थान व तेथील हेमाडपंती मंदिरे व जैन तीर्थंकर आदींच्या अवशेषांचे जतन करणे व मंदिरांचा जीर्णोद्धार करणे आदी कामांचा यात समावेश आहे. अंजनेरीचे ही सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारितील आहेत. त्र्यंबकेश्वर येथेही काही कामांचा ‘प्रसाद’मध्ये सहभाग आहे. या कामात नगर परिषदेचादेखील सहभाग असावा, त्यांचेही नियंत्रण असावे या पार्श्वभूमीवर पालिकेच्या शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांना साकडे घातले. याप्रसंगी अभियंता विनय वावधन, महेश बागुल, सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे, राजेश घुले, तुषार पाटील आदी उपस्थित होते.
सुरू असलेली कामे
गौतम, गंगासागर आणि इंद्रतीर्थ तलावाचे सुशोभीकरण, तीर्थराज कुशावर्ताचे सुशोभिकरण, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील उद्यानाचे विकसन, श्रीगंगा गोदावरी घाट चौक विकसन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक विकसन, अहिल्या गोदावरी संगमघाट चौकाचे विकसन, यात्रास्थानाकडील प्रवेश मार्गाचे विकसन, मुख्य प्रवेशमार्गाचे विकसन, वाहनतळाचे विकसन, संगम घाटावर पायाभूत सुविधांचे विकसन.