रस्त्याच्या मध्यभागीच अडथळा; वृक्ष ठरताहेत जीवघेणे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:46 PM2017-11-26T23:46:33+5:302017-11-27T00:35:41+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरची वाताहत झाल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे रस्त्याच्या मध्ये आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे सदर झाडे तोडायला बंदी आहे. या झाडांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. धोकेदायक वृक्षांची वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून झाडाच्या खाली लोखंडी पाटीचे रिफ्लेक्टर लावण्यात आले होते. महामार्गावरील वाहनांच्या धुरामुळे जमिनीपासून झाडाच्या खोडापर्यंत वृक्ष काळवंडून गेले आहेत. यामुळे सायंकाळनंतर अंधारात वाहनधारकांना रस्त्यातील वृक्षांचा अंदाज येत नाही. त्या ठिकाणी लावलेल्या लोखंडी रिफ्लेक्टरच्या प्लेटा या वाहनांच्या धडकेमुळे काही ठिकाणी तुटून गेल्या आहेत. तर काही प्लेटा भुरट्या चोरांनी चोरून नेल्या आहेत. यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अनेक निरपराध वाहनधारकांचे बळी गेले आहेत, तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ नवीन रिफ्लेक्टर बसवावे, अशी मागणी केली जात आहे.
रिफ्लेक्टरची झाली वाताहत
नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलदरम्यान दुतर्फा मार्गावरील रस्त्यामध्ये असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी रिफ्लेक्टर प्लेट काही ठिकाणी तुटून पडल्या आहेत. काही ठिकाणी लोखंडी सांगाडा वाकलेल्या स्थितीत उभा आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्यामधील वृक्षांचा अंदाज येत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी वारंवार अपघात होतात. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत दुतर्फा असलेल्या धोकेदायक वृक्षांजवळ नवीन रिफ्लेक्टर बसवावे. याठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होतात.