गोठ्यांमधील मलमूत्र रस्त्यावर रहिवाशांनी रोखली वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:29 AM2018-05-09T00:29:38+5:302018-05-09T00:29:38+5:30
नाशिक : आठवडाभरापासून वडाळारोडवरील प्रभाग २३ मधील जयदीपनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत रस्त्यावर गोठ्यांमधील मलमूत्र मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले.
नाशिक : आठवडाभरापासून वडाळारोडवरील प्रभाग २३ मधील जयदीपनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत रस्त्यावर गोठ्यांमधील मलमूत्र मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले. वारंवार तक्रार करूनही याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात रहिवाशांनी मंगळवारी (दि. ८) रास्ता रोको आंदोलन केले. वडाळागावासह वडाळारोड परिसर म्हशींच्या गोठ्यांसाठी ओळखला जातो. अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य यामुळे नेहमीच हा परिसर चर्चेत असतो. गोठेधारकांनी गोठ्यांमधील म्हशींचे मलमूत्र वाहून नेणाऱ्या मलवाहिन्या थेट महापालिकेच्या भूमिगत गटारीत जोडल्या असल्यामुळे अनेकदा मैला साचून गटारी नादुरुस्त होऊन मलमूत्र रस्त्यावर पसरते. त्यामुळे अनेकदा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. मागील आठ दिवसांपासून पुन्हा या भागातील गटारी रस्त्यावर वाहू लागल्यामुळे व सर्वत्र मलमूत्र पसरल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे जयदीपनगर, मिल्लतनगर, चिश्तिया कॉलनी हा संपूर्ण परिसर वडाळा रस्त्याच्या दुतर्फा असल्याने बाधित झाला होता. या भागात प्रचंड दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. ही बाब नगरसेवक शाहीन मिर्झा यांच्या निदर्शनास रहिवाशांनी आणून दिली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर सर्व कॉलन्यांमधील महिला व पुरुषांनी एकत्र येत मिर्झा यांना बोलावून घेत रास्ता रोको आंदोलन केले.
संतापाचा उद्रेक
नागरिकांनी वाहने भर रस्त्यात आडवी लावून वाहतूक रोखली. जोपर्यंत संपूर्णत: स्वच्छता केली जात नाही आणि गटारींची दुरुस्ती करून रस्त्यावर वाहणारे मलमूत्र थांबविले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची आक्रमक भूमिका महिलांनी घेतली. यावेळी वडाळारोडवर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त रहिवाशांची समजूत काढली.