खते मिळाल्याची पोहोच बंधनकारक
By admin | Published: June 2, 2016 11:48 PM2016-06-02T23:48:54+5:302016-06-03T00:04:40+5:30
जिल्हा परिषद : कृषी समिती बैठक
नाशिक : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी २ लाख ११ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. बियाण्यांचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, खतांचा पुरवठा कंपनीकडून वितरकांकडे झाल्यानंतर या वितरणाची पोहोच संबंधितांनी भ्रमणध्वनीवर देण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
नुकतीच कृषी समितीची मासिक बैठक सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत जिल्हा परिषद सेस अंतर्गत ५० टक्के अनुदानावर सन २०१५-१६ मध्ये वाटप करण्यात आलेल्या ताडपत्री, विद्युतपंप, कडबाकुट्टी, मशीन आदि साहित्यांच्या वाटपाचा आढावा घेण्यात आला. अनुसूचित जाती, नवबौद्ध, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी वाटप केलेल्या अनुदानातून झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा करण्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. खरीप हंगाम २०१६ साठी बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आलेले असून, बियाण्यांचा पुरवठा सुरू झालेला आहे. जिल्ह्यासाठी दोन लाख ११ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. बैठकीस केरू पवार, श्रीमती भावनाताई भंडारे, अर्जुन बर्डे, सुनीता चव्हाण, जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)