मुख्यमंत्र्यांचे निमित्त झाले अन् दोन विरोधक एकत्र आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:57 AM2021-03-20T00:57:52+5:302021-03-20T00:58:52+5:30
एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दर्शवून दिले आहे. यास बनकर आणि कदम हे तरी अपवाद का ठरावेत? हे दोनही विरोधक एकत्र आले, चर्चाही झाली. निमित्त होते... मुख्यमंत्री ठाकरे यांचे ओझर विमानतळावरील स्वागताचे!
ओझर : एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दर्शवून दिले आहे. यास बनकर आणि कदम हे तरी अपवाद का ठरावेत? हे दोनही विरोधक एकत्र आले, चर्चाही झाली. निमित्त होते... मुख्यमंत्री ठाकरे यांचे ओझर विमानतळावरील स्वागताचे!
शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी ओझर विमानतळावर काही काळ थांबले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी विमानतळावर असलेल्या एका कक्षात छोटेखानी बैठक घेतली. वीजबिलांबाबत थकबाकी ७० हजार कोटींच्या वर गेली असल्याने त्यावर गंभीर चर्चा झाली. द्राक्षांबाबत केंद्राने सबसिडी बंद केल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, त्यावर ठाकरे यांनी याविषयी केंद्राकडे तातडीने शिफारस करणार असल्याचे सांगितले. कांद्याच्या भावाला लागलेली गळती बघता त्यावर तोडगा काढण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. कदम यांनी ओझर नगर परिषद व्हावी, यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केले. त्याचाच दाखला देत मुख्यमंत्र्यांनी आता ओझर नगर परिषदेला रुरल मॉडेल सिटी बनवून दाखवा. त्यासाठी मी खंबीरपणे पाठीशी आहे, असे सांगितल्याने ओझरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, नसतील तरच नवल!
सकारात्मक संदेश
स्थानिक पातळीवर एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणारे कदम आणि बनकर हे दोन्हीही सत्ताधारी गटाचे झाल्याने या दोघांचेही नेते राज्याचे प्रमुख आहेत. त्याचा प्रत्यय अनेकवेळा मुंबई-नाशकात आला असला तरी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोघांना सोबत घेत वीज, कोविड, शेतमाल हमीभाव, कांदा, द्राक्षे संकट अशा विविध विषयांवर चर्चा केल्याने या एकत्रीकरणाचा सर्वत्र सकारात्मक संदेश जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.