राणे यांच्या वादाचे निमित्त; सेना- भाजपची नवी पिढी ‘रस्त्यावर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:19 AM2021-08-28T04:19:51+5:302021-08-28T04:19:51+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका सेनेला जहरी वाटली आणि बुधवारी ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका सेनेला जहरी वाटली आणि बुधवारी सकाळीच शिवसेनेच्या युवा आघाडीने भाजप कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयावर त्यांनी दगडफेक केली आणि त्याचे समर्थनदेखील त्यांनी केले. त्यानंतर भाजपचे काही युवक सेनेवर चालून गेले आणि मुकेश शहाणे विरुद्ध सेनेचे युवा कार्यकर्ते यांच्यात झालेली फ्री स्टाइलदेखील चर्चेत ठरली. अर्थात, शिवसेनेच्या संघर्ष काळात ज्यांनी अशीच आंदोलने केली आणि सेना स्टाइल म्हणून रस्त्यावर उतरणारे जे दरवेळेसचे नेते होते ते यंंदा रस्त्यावर दिसले नाहीत. माजी महापौर विनायक पांडे, वसंत गीते, सुनील बागुल, अजय बोरस्ते असे अनेक नेते पक्षात असले तरी यंदा फ्रंटवर नव्हते. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि अजय बोरस्ते यांनी फिर्याद दिली. तर रस्त्यावर बाळा दराडे, योगेश बेलदार,महेश बडवे, वैभव खैरे, दिगंबर मोगरे, हेमंत उन्हाळे, सुनील गेाडसे, संजय चिंचेारे, दस्तगीर रंगरेज, बाळा कोकणे, दीपक दातीर, सुनील जाधव असे अनेक युवा सेनेचे पदाधिकारी होते.
भाजपात तसे संघर्ष करणारी फळी नाहीच. त्यामुळे आंदोलने ठीक; परंतु दोन हात करण्याची गरज निर्माण झाल्यानंतरसुद्धा मुकेश शहाणे, अनिकेत सेानवणे, अमित घुगे, अमेाल इघे, किरण गाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी होते, असे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद केले असल्याने यंदा युवा पिढीच आघाडीवर असल्याचे दिसले.
इन्फो...
काँग्रेस- राष्ट्रवादीचे मात्र मौन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यावरून सेना भाजपात मोठा वाद झाला. राणे यांनी पक्षाचे प्रमुख नव्हे तर मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीविषयी अनुद्गार काढले, असा सेनेचा आरोप होता. त्यामुळे त्यांनी आक्रमक आंदोलने केली असली तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मात्र मौन बाळगले. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी साथ दिली नाही.