आॅक्टोबर हिट : नाशिककरांना उन्हाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 04:29 PM2018-10-07T16:29:16+5:302018-10-07T16:32:07+5:30
रविवारी (दि.७) सकाळपासून ऊन तापले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आॅक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. आॅक्टोबर महिना हा हिवाळ्याची चाहूल देणारा ठरतो; मात्र अद्याप किमान तपमानाचा पाराही वीस अंशावर असून दिवसा ऊन व रात्री उकाडा असा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे.
नाशिक : आठवडाभरापासून नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. कमाल तपमानाचा पारा ३३ अंशाच्यापुढे सरकला असल्याने उकाडा वाढला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा व रात्रीदेखील वाऱ्याचा वेग मंदावलेला राहत होता. त्यामुळे उकाडा असह्य होऊ लागला आहे.
रविवारी (दि.७) सकाळपासून ऊन तापले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आॅक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. आॅक्टोबर महिना हा हिवाळ्याची चाहूल देणारा ठरतो; मात्र अद्याप किमान तपमानाचा पाराही वीस अंशावर असून दिवसा ऊन व रात्री उकाडा असा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी दिवसभार वा-याचा वेग काहीसा टिकून राहिल्याने दिलासा मिळाला; मात्र काही भागात वा-याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. संध्याकाळी वातावरणात गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून केली जात असली तरी तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळीही वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे.
आॅक्टोबर महिन्याचा प्रारंभच तापदायक झाला. कारण सोमवारी (दि.१) कमाल तपमानाचा उच्चांक नोंदविला गेला. यादिवशी पारा ३४.१ अंशावर पोहचला होता. संपुर्ण आठवडाभर पारा तीशीच्यापूढेच स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. किमान तपमानाचा पाराही वीस अंशाच्या जवळपास राहत आहे. सकाळच्या सुमारास काही दिवस धुकेही दाटून आले होते. यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा गुलाबी थंडीचे आगमन लांबणार असल्याचे चिन्हे आहेत. सध्या वातावरणासोबत ऋूतूमानातही बदल जाणवू लागला आहे.
दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने नागरिकांनी रविवारी सुटीच्या दिवशीही घराबाहेर पडणे टाळले. संध्याकाळी सहा वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे; मात्र थंडपदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारिरिक तक्रारींना कारणीभूत ठरु शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.