वृक्षांवर जाहिरातींचे फलक ठोकणाऱ्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:11 PM2019-03-19T23:11:58+5:302019-03-20T01:09:13+5:30
इंदिरानगर परिसरात विविध वृक्षांना खिळे मारून वृक्षास इजा पोहोचवणाऱ्या सहा जाहिरातदारांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर : परिसरात विविध वृक्षांना खिळे मारून वृक्षास इजा पोहोचवणाऱ्या सहा जाहिरातदारांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पूर्व विभागाचे उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी व सचिन देवरे, प्रभाकर बेंडकुळे यांनी कर्मचाऱ्यांसोबत परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना या भागातील वृक्षांना खिळे ठोकून होर्डिंग व जाहिराती लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ कारवाई करीत याबाबत इंदिरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांना या भागात दिसून आलेल्या फलकांमध्ये रजिस्टर रेंट अग्रीमेंट, राज कॉम्प्युटर, एसएन पेस्ट कंट्रोल, अशट्ल प्रिस्कूल, डेकेअर अक्टिव्हिटी, कम्प्युटर सेंटर आदी विविध जाहिरातीचे होर्डिंग व फलक वृक्षांना खिळे मारून लावलेले आढळून आले. यामुळे वृक्षाना इजा पोहोचण्याची शक्यता असल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी राज्य नागरी क्षेत्र झाडाचा जतन अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.