टोल कंपन्यांकडून मला ऑफर राज ठाकरे यांचा दावा : महाविकास आघाडीत जाणे शक्य नाही
By Suyog.joshi | Published: February 2, 2024 03:51 PM2024-02-02T15:51:18+5:302024-02-02T15:52:36+5:30
मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे.
नाशिक : टोलला माझा विरोध नसून टोल वसुलीला विरोध आहे, असे सांगत महाविकास आघाडीत जाणे कदापि शक्य नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली. टोल वसुलीवर जी कॅश घेतली जाते त्याला माझा विरोध असून, त्यात कोणतीही स्पष्टता नाही.
मुंबई-पुणे महामार्गावर किती पैसे वसूल केले जातात, याबाबत सर्व कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्या भेटून त्याचे प्रेझेंटेशन दाखवत आकडेवारी देणार आहे. पैसे टोलवाल्यांच्या खिशात जात आहेत किंवा त्याच्या खिशातील पैसे राजकीय पक्षाच्या फंडात जात असतील तर ते मी सहन करणार नाही. रस्त्यांमध्ये जर खड्डे असतील तर टोल कशासाठी? कोकणातील रस्ता पूर्ण नाही तरी तिथे एक टोल आहे. ट्रान्सहार्बर रोडवर चांगले कॅमेरे, मग टोलवर कॅमेरे बसवा माणूस कशाला पाहिजे? असा उलट प्रश्न विचारत राज्य सरकार आणि खासगी माणसाच्या खिशात किती पैसे जातात, हे बघायला पाहिजे. मलाही टोल कंपन्यांकडून ऑफर आल्या, त्यांना म्हटलं इथेच मारीन, असेही राज यांनी सांगितले.
महागाईवर कोणी बोलत नाही
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज म्हणाले, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, इंधन दरवाढीवर कुणी बोलायला तयार नाही. मराठी माणसाला घर नाकारलं त्यावर कुणी बोलत नाही, अशा सर्व राजकीय घडामोडी सुरू आहेत. जेथे बोलायला पाहिजे, तेथे कोणी बोलत नाही, अशी अवस्था झाली आहे.
सत्तेतील गटबाजी दिसत नाही
पक्षातील गटबाजीच्या प्रश्नावर बोलतांना राज म्हणाले, सर्वच पक्षात सध्या गटबाजी आहे. फक्त सत्तेतील गटबाजी दिसत नाही, ती विरोधी पक्षातील दिसते.
लोकसभा निवडणूक येत आहे, तेव्हा त्यांच्यातील तडे दिसू लागतील, तसा आमचा उघडा कारभार आहे. काल आमच्या कार्यकर्त्यांना पहिला डोस दिला, त्याचा फरक पडला नाही तर पुन्हा देऊ. ज्यांची पोच नाही त्यांच्या भरवश्यावर निवडणूका लढवणार नाही. दोन चार टाळक्यांच्या भरवशावर निवडणूक लढणार नाही. ५२ पत्त्याचा कॅट किती दिवस पिसणार?
परत उपोषण कशासाठी
मराठा आरक्षणप्रश्नी बोलतांना राज म्हणाले, आरक्षण हा तांत्रिक विषय आहे. सर्व मागण्या मान्य झाल्या, आता परत मनोज जरांगे पाटील यांचे परत उपोषण कशासाठी? असे सांगत हा कुणाच्या राजकीय अजेंड्याचा विषय आहे एकदा विचार व्हायला हवा. मराठा समाजाच्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. आरक्षणाबाबत केंद्रालाच विचार करावा लागला तर त्यांना प्रत्येक राज्यात जावे लागेल असेही राज म्हणाले.