पदाधिकारी मुलाखतींना वादाची झालर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:36 AM2018-07-09T01:36:24+5:302018-07-09T01:41:41+5:30
नाशिक : शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी पदाधिकारी नियुक्त करण्याच्या दृष्टीने रविवारी (दि़८) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ तथापि अनेक जुन्या-जाणत्यांना याबाबत माहिती मिळाली नव्हती, तसेच अनेक विधानसभा निवडणुकीच्या दावेदारांनी आपले समर्थक पाठवून त्यांची पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यासाठी खेळी केल्याने हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला़
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल करण्यास प्रारंभ केला आहे़ त्याअंतर्गत महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या दोघांकडे शहरातील चार पैकी दोन-दोन विधानसभा मतदारसंघ विभागून दिले
आहेत़ त्यापैकी पूर्व आणि पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी नियुक्त करण्यासाठी रविवारी मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊलाल चौधरी यांनी मुलाखती घेतल्या़ या मुलाखतींची पूर्वतयारी करण्यात आली असली तरी इच्छुकांनी या मुलाखतीस उपस्थित रहावे याबाबतचे आवाहन केवळ पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून करण्यात आले़ यामुळे सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हा संदेश
पोहोचला नाही, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे़ पक्षात ज्यांनी येऊन काम करावे अशा कार्यकर्त्यांना बोलविण्याबाबत कोणताही पुढाकार घेतला नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे़विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी आपल्या समर्थकांनाच या मुलाखतीसाठी पाठविले होते़ मुलाखत देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचे नाराज गटाचे म्हणणे आहे़ विशेष म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडून दुसºया पक्षात असलेल्या एका पदाधिकाºयाच्या समर्थकांचा मुलाखत देणाºयांमध्ये अधिक भरणा असल्यामुळे हीदेखील चर्चेची बाब ठरली़
पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख नीलेश कुलकर्णी हे या मतदारसंघातून निवडणूकीसाठी इच्छूक असल्याचे सागिंतले जाते़ त्यामुळे चौध२रींसमोरच पक्षाची स्थिती व नाराजीबाबत कसे बोलणार असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते़ त्यामुळे या मुलाखतींवर बहिष्कार टाकल्याचे काही कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले़
शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी तसेच कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी इच्छूक तसेच कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते़ मात्र, अशा प्रकारे मुलाखती झाल्याने यातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईतील नेत्यांशी संपर्क साधण्याची तयारी सुरू केली आहे़
आगामी निवडणुकांच्या संदर्भात पदाधिकारी नियुक्ती तसेच कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे संदेश पाठविण्यात आले होते़ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मुलाखतीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली असून, पक्षातील पदे देण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील़ यावेळी काही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष लढलेल्या शिवसैनिकांना पक्षातून न काढता त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करण्याची विनंती केली़
- सचिन मराठे, महानगरप्रमुख, शिवसेना