कारकिर्दीतील अखेरच्या सभेत पदाधिकारी, सदस्य आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:43 AM2019-12-21T00:43:26+5:302019-12-21T00:44:49+5:30
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक होत खातेप्रमुखांच्या वर्तनाचे वाभाडे तर काढलेच, परंतु फाइलींची अडवणूक व लांबलेल्या प्रवासाबद्दल जाब विचारून दोषींवर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक होत खातेप्रमुखांच्या वर्तनाचे वाभाडे तर काढलेच, परंतु फाइलींची अडवणूक व लांबलेल्या प्रवासाबद्दल जाब विचारून दोषींवर कारवाईसाठी प्रशासनावर दबाव आणला आहे. अखेर खातेप्रमुखांवर कारवाई तर फाइली अडवून ठेवणाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाºयांना घ्यावा लागला.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य महेंद्रकुमार काले यांनी खातेप्रमुखांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करून या विषयाला वाचा फोडली.
सन २०१७-१८ चे ८३ कोटी निधी परत गेला तर यंदा सुमारे दोनशे कोटी रुपये परत जाण्याची चर्चा आवारात होत असल्याचे सांगितले. सदस्यांकडून कामे सांगितल्यावर खातेप्रमुखांकडून दुरुत्तरे तसेच कामांची टाळाटाळ केली जाते. जिल्हा परिषदेचा प्रत्येक सदस्य ४० हजार जनतेतून निवडून येत असताना त्यांना जिल्हा परिषदेत काहीच किंमत नसल्याचा अनुभव सर्व सदस्य घेत असून, असाच कारभार चालू राहिल्यास पुढच्या निवडणुकीला जनता आम्हाला निवडून पाठविणार नाही, अशी भावना व्यक्त केली. त्यावर अन्य सदस्यांनीही सहमती दर्शवित आपल्याला आलेल्या अनुभवांचे कथन सुरू केले.
शिक्षण सभापती यतिन पगार यांनी व्यासपीठावरूनच प्रशासनाच्या विरोधात तक्रारींचा पाढा रचला तर उपाध्यक्ष नयना गावित यांनी खातेप्रमुखांना जिल्हा परिषदेत जनतेच्या कामासाठी शासनाकडून नेमण्यात आले असून, सदस्य व पदाधिकाºयांची कामे ते करणार नसतील तर जनतेची कामे कशी होणार, असा सवाल केला. उदय सांगळे यांनी, शासकीय कन्या शाळेच्या दुरुस्तीचे काम करणाºया ठेकेदाराची अनामत रक्कम परत करण्याची फाइल शेरा मारून परत करण्यात आली, त्यामुळे काही विशिष्ट खात्याच्या फाइलीच क्लिअर होत असल्याचा आरोप केला.
संजय बनकर यांनी एकेक फाइलींचा प्रवास चार ते पाच महिने चालणार असेल तर उपयोग काय? असा सवाल केला. निलेश ठाकरे यांनी, जिल्हा परिषद सदस्य जनतेचीच कामे अधिकाºयांना सांगतात स्वत:च्या घरची नाहीत असा टोला लगावला. दीपक शिरसाठ यांनीही त्यास सहमती दर्शविली.
तत्कालीन अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी जिल्हा परिषदेचा सत्यानाश केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यांच्याकडे गेलेली कोणतीही फाइल क्लिअर झाली नाही, उलट त्या फाइलींमागे त्यांना काही तरी अपेक्षित होते, असेही सांगण्यात आले. खुद्द अध्यक्ष शीतल सांगळे यांनीदेखील या सभेत आक्रमकता दाखवित, सदस्यांच्या भावना ऐकून सभागृहात बसायला दु:ख होत असल्याची टीका केली.
फाइल लांबविणाºयांचे वेतन कपात
सभेत सदस्यांचे आक्रमक रूप पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची चांगलीच कोंडी झाली. एकीकडे सदस्य, पदाधिकाºयांचे आरोप-प्रत्यारोप व दुसरीकडे खातेप्रमुख अशा कात्रीत सापडलेल्या भुवनेश्वरी यांनी अखेर आपल्याकडे आलेल्या
फाइलीवर सात दिवसांच्या आत संबंधित खातेप्रमुखाने येऊन चर्चा करावी, त्रुटी असल्यास त्या पंधरा
दिवसांत पूर्तता करावी मात्र या दोन्ही बाबींची अंमलबजावणी न करणाºया अधिकाºयाकडे
जितके दिवस फाइल पडून राहील तितक्या दिवसाचे त्यांच्या वेतनात कपात करण्यात येईल, असा निर्णय दिला.
महिला अधिकाºयाविरोधात महिला
शुक्रवारच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके यांच्या विरोधात महिला पदाधिकारी व सदस्यांनीच आक्रमक पवित्रा घेतला. एकीकडे जिल्हा परिषदेत महिला राजचे कौतुक होत असताना विद्यमान पदाधिकाºयांच्या अखेरच्या सभेत मात्र महिला पदाधिकारी व सदस्य महिला अधिकाºयांच्या विरोधातच रिंगणात उतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातून एका महिला अधिकाºयावर कारवाईची कुºहाड कोसळली.