पदाधिकाऱ्यांनो, आत्मपरीक्षण करा !
By Admin | Published: September 27, 2016 11:51 PM2016-09-27T23:51:44+5:302016-09-27T23:52:11+5:30
सदस्यांचा सल्ला : सर्वसाधारण सभेत चांदवड इमारत निविदेचा विषय गाजला
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना अद्यापही वाणिज्य दराने आकारण्यात येणारी वीजबिले तत्काळ कमी करण्यात यावीत, तसेच चांदवड प्रशासकीय इमारतीच्या कामाबाबत चार महिने झालेली चालढकल यावरून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या उपस्थितीत आमसभा बोलाविण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती केदा अहेर, उषा बच्छाव, शोभा डोखळे, किरण थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदिंसह सभेस सर्व सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते. प्रा. प्रवीण गायकवाड यांनी येवला तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र बंद असल्याबाबत लक्ष वेधले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना अद्यापही वाणिज्य दराने कर आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप केला. मालेगाव तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांना अशी वाणिज्य दराने वीज मंडळाकडून आकारणी करण्यात येत असल्याचे पंचायत समिती सभापती भरत पवार यांनी सांगितले. त्याचवेळी ज्योती माळी, विलास माळी, बंडू गांगुर्डे, दादाजी अहिरे, पंचायत समिती सभापती अनिता जाधव यांनी चांदवड प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या निविदा मंजूर होऊनही प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश का देण्यात आले नाहीत? ही फाईल नेमकी कुठे अडकली आहे? याची विचारणा केली. त्याचवेळी या कामासाठी काही तांत्रिक अडचण आली काय? अशी विचारणा डॉ. प्रशांत सोनवणे यांनी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी या कामासाठी तांत्रिक अडचण होती. निविदा उघडण्यासाठी विलंब झाला, याची कबुली देतानाच सर्व काही नियमानुसारच करण्यात आल्याचे सांगितले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी या निविदा काढण्याच्या प्रक्रियेला चार महिने विलंब झाला. त्याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे. नव्याने फेरनिविदा काढण्यात येईल, असे सांगताच ज्योती माळी व विलास माळी यांनी आक्रमक होत आता विलंब नको, तत्काळ कारवाई करावी, असे सांगितले. याबाबत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश विजयश्री चुंबळे यांनी प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)